पगारवाढीनंतरही संपावर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 05:00 AM2021-11-26T05:00:00+5:302021-11-26T05:00:45+5:30
एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन पुकारले. यानंतर चर्चेच्या विविध फेऱ्या पार पडल्या. मात्र, एस. टी. कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी बुधवारी वेतनवाढीची घाेषणा केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या संपावर ताेडगा काढण्यासाठी राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्याची घाेषणा बुधवारी केली. पगारवाढीच्या घाेषणेनंतर गुरूवारी एस. टी. कर्मचारी कामावर परततील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, जिल्ह्यातील एकही संपकरी कर्मचारी कामावर पाेहाेचला नाही. त्यामुळे गुरूवारी एस. टी. महामंडळाचे कामकाज ठप्प पडले हाेते.
एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन पुकारले. यानंतर चर्चेच्या विविध फेऱ्या पार पडल्या. मात्र, एस. टी. कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी बुधवारी वेतनवाढीची घाेषणा केली. यात १० वर्षांची सेेवा झालेल्यांना ५ हजार रूपयांची वाढ, २० वर्ष सेवा झालेल्यांना ४ हजार रूपये तर २० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्यांना २ हजार ५०० मूळ वेतनात वाढ केली आहे.
या वेतनवाढीनंतर काही कर्मचारी कामावर परततील, अशी अपेक्षा हाेती. मात्र, गडचिराेली विभागांतर्गत येणाऱ्या गडचिराेली, अहेरी व ब्रह्मपुरी आगारातील एकही कर्मचारी कामावर गेला नाही. जाेपर्यंत विलिनीकरण हाेत नाही, ताेपर्यंत कामावर जाणार नाही, अशी प्रतिक्रिया एस. टी. कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे हा संप आणखी किती दिवस चालणार, हे सांगणे कठीण आहे.
गैरसोय टाळण्यासाठी संप मागे घ्या
- २४ दिवसांपासून सुरू असलेल्या एस. टी.च्या संपामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. खासगी प्रवासी वाहनधारक मोठ्या प्रमाणात प्रवाशांची लूट करत आहेत. या संपामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विद्यार्थी व नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी संप मागे घ्यावा, असे आवाहन आमदार डाॅ. देवराव होळी यांनी गुरुवारी गडचिरोली येथील एस. टी. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मंडपाला भेट देऊन केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, सदस्य शंकर नैताम यांच्यासह एसटी आगाराचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.