‘नो पार्किंग’ची कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:01 AM2017-09-25T00:01:08+5:302017-09-25T00:02:09+5:30

गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून पोलीस व नगर परिषद प्रशासनाने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता.

Strong enforcement of 'no parking' | ‘नो पार्किंग’ची कडक अंमलबजावणी

‘नो पार्किंग’ची कडक अंमलबजावणी

Next
ठळक मुद्देगडचिरोली आठवडी बाजारातील मार्ग मोकळा : पोलीस बंदोबस्त व ध्वनीक्षेपकाने आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरातील रस्त्याच्या दुतर्फाचा परिसर ‘नो पार्किंग झोन’ म्हणून पोलीस व नगर परिषद प्रशासनाने चार दिवसांपूर्वी जाहीर केला होता. रविवारच्या आठवडी बाजारादरम्यान चोख पोलीस बंदोबस्तात ‘नो पार्किंग झोन’ची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदाच बाजाराच्या दिवशी मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली नसल्याचे दिसून येत होते.
गडचिरोली शहरातील नागरिक तसेच गडचिरोली तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक आठवडी बाजारासाठी येत असल्याने आठवडी बाजारात प्रचंड गर्दी राहते. विशेष म्हणजे, गडचिरोली शहरातील आठवडी बाजार गडचिरोली-मूल या राष्टÑीय महामार्गाच्या अगदी बाजुला भरतो. बाजारासाठी आलेले नागरिक दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या बाजुला ठेवत होते. दोन्ही बाजुला दुकाने, त्याच्यासमोर दुचाकी वाहने व रस्त्यावरून आठवडी बाजारातील विक्रेते तसेच नागरिकांची गर्दी यामुळे या ठिकाणी दिवसभर वाहतुकीची कोंडी होत होती. गडचिरोली शहर वाहतूक शाखेने मागील आठ महिन्यांपासून आठवडी बाजाराच्या दिवशी एसटी वगळता ट्रक व इतर मोठी वाहने शहरातून नेण्यास प्रतिबंध घातला होता. इंदिरा गांधी चौक व न्यायालय परिसरात एक वाहतूक पोलीस ठेवून या मार्गाने येणारी वाहने सेमाना मार्गे वळविली जात होती. वाहतूक शाखेचा हा प्रयोग यशस्वी झाला व याची अंमलबजावणी प्रत्येक आठवडी बाजाराच्या दिवशी केली जात आहे. मात्र शहरातून चारचाकी वाहने, बस जात असल्याने वाहतुकीची कोंडी होतच होती.
यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषद व शहर वाहतूक पोलीस शाखेने आठवडी बाजार परिसरातील मुख्य रस्त्याच्या बाजुचा परिसर नो पार्किंग झोन म्हणून जाहीर केला. याची अंमलबजावणी करण्याचा पहिलाच दिवस असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी अमृता राजपूत यांच्या मार्गदर्शनात आठ वाहतूक पोलीस, १० होमगार्ड व १० पोलीस मुख्यालयातील कर्मचारी तैनात करण्यात आले होते. रस्त्याच्या मच्छी बाजाराच्या बाजुने लालपट्टी लावून त्यावर प्रत्येक ठिकाणी नो पार्र्किंग झोन अशी सूचना दर्शविणारे फलक लावण्यात आले होते. बाजार परिसरात ध्वनीक्षेपकाच्या मदतीने पार्किंग झोन कुठे आहे, या विषयची माहिती दिली जात होती. त्याचबरोबर पोलीस कर्मचारीही दुचाकीस्वार नागरिकांना मार्गदर्शन करीत होते. तरीही काही नागरिकांचा गोंधळ उडत होता. मात्र दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार नागरिक पार्किंगच्या जागेवर वाहने नेऊन लावत होते. नागरिकांना शिस्त लागेपर्यंत काही दिवस पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी अपेक्षा काही नागरिकांनी व्यक्त केली.
पार्किंगच्या जागेवर भविष्यात घाणीची समस्या
मच्छी बाजाराच्या बाजुला असलेल्या तलाव परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी चार वर्षांपूर्वी काम करण्यात आले. सदर काम अर्धवट आहे. समोरच्या बाजुला वाहने ठेवण्यासाठीच जागा तयार केली होती. नगर परिषदेने सदर जागेची साफसफाई केली. त्यामुळे रविवारी या ठिकाणी घाण दिसून येत नव्हती. मात्र काही नागरिक याच ठिकाणी शौचास बसतात. त्यामुळे भविष्यात या पार्किंगच्या जागेवर घाणीचे साम्राज्य निर्माण होण्याची शक्यता आहे. घाण तयार झाल्यास वाहनधारक त्या ठिकाणी वाहने ठेवणार नाही. नागरिक पार्किंगच्या जागेवर शौचास बसणार नाही, यासाठी नगर पालिका कोणती उपाययोजना करते यावर नव्याने निर्माण केलेल्या पार्किंग झोनचे भविष्य राहणार आहे.
नागरिकांचा उडाला गोंधळ
आजपर्यंत रस्त्याच्या बाजूची जागा हीच नागरिक पार्किंग झोन समजून दुचाकी वाहने लावत होती. आज मात्र या बाजुला लाल रंगाच्या पट्ट्या लावण्यात आल्या होत्या व जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर पार्किंगची जागाही माहित नसल्याने वाहन ठेवावे कुठे, असा प्रश्न वाहनधारकांसमोर निर्माण होत होता. यावेळी संबंधित नागरिक पोलिसांना याबाबत विचारणा करीत होते. पोलीस पार्किंग झोनची जागा दाखवित होते. त्यानंतर वाहन चालक संबंधित पार्किंग झोनमध्ये दुचाकी वाहने नेऊन ठेवत होती.
पार्किंग झोनकडे जाण्यासाठी तलावाच्या पाळीवरून खाली उतराना तात्पुरत्या स्वरूपात माती टाकण्यात आली आहे. पाऊस आल्यास या ठिकाणी चिखल निर्माण होणार आहे. चारचाकी वाहनांच्याही पार्किंगचा प्रश्न कायम आहे.

रस्त्याच्या बाजूला वाहन उभे ठेवण्यास प्रतिबंध घातल्यास वाहतूक पोलिसांना नागरिक पार्किंगची सोय करून द्या, असे प्रतिउत्तर देत होते. आता नागरिकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. पार्र्किंगच्या जागेवर नेऊन वाहन लावावे. पहिला दिवस असल्याने फार कमी वाहने चालन करण्यात आली. प्रत्येक दुचाकीस्वाराला पोलीस सूचना देत होते. सर्वांच्या फायद्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
- अमृता राजपूत, पोलीस उपनिरिक्षक,
शहर वाहतूक पोलीस शाखा गडचिरोली

Web Title: Strong enforcement of 'no parking'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.