निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:12 AM2017-10-16T00:12:45+5:302017-10-16T00:12:57+5:30
जिल्ह्यातील एकूण २६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य यांची निवड अविरोध झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील एकूण २६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य यांची निवड अविरोध झाली आहे. त्यामुळे २४ ग्रामपंचायतीत सोमवारी मतदान घेतले जाणार आहे. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
पहिल्यांदाच सरपंचाची निवड थेट नागरिकांमधून होणार आहे. त्यामुळे गावातील मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. प्रत्येक मतदाराला सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी दोन मतदान करावे लागणार आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मानला जातो. पोलिंग पार्ट्यांवर नक्षली हल्ला झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन विशेष नियोजन केले आहे. दुर्गम भागातील बुथांवर शनिवारी सायंकाळपर्यंत पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या आहेत. २४ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी ७० व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण ३४९ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदानादरम्यान २८ हजार २१३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १३ हजार ६६३ महिला व १४ हजार ५५८ पुरूष मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी एकूण ७७ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. यामध्ये २६ केंद्र अतिसंवेदनशील, २३ मतदान केंद्र संवेदनशील व २८ मतदान केंद्र सर्वसाधारण आहेत. अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस विभागाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. एवढेच नव्हे तर पोलीस बंदोबस्तात पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या. सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार असून मंगळवारी निकाल घोषित केला जाणार आहे.
बोगाटोला व नवरगावात अविरोध निवड
कोरची तालुक्यातील बोगाटोला येथे ग्रामपंचायत सदस्यांची संख्या सात एवढी आहे. त्यापैकी उमेदवारी अर्ज भरणारे पाच सदस्य अविरोध निवडून आले आहेत. उर्वरित दोन सदस्य व सरपंचपदासाठी नामांकनच भरण्यात आला नाही. त्यामुळे या गावात मतदान घेतले जाणार नाही. धानोरा तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य अविरोध निवडून आले आहेत.
कुरखेडा तालुक्यातील नवेझरी, कुंभीटोला, देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, आरमोरी तालुक्यातील कोजबी, सुकाळा, धानोरा तालुक्यातील मिचगाव, नवरगाव, खुटगाव, गडचिरोली तालुक्यातील राजोली, कोटगल, चामोर्शी तालुक्यातील वरूर, भाडभिडी, मार्र्कंडादेव, ठाकरी, एटापल्ली तालुक्यातील तोडसा, अहेरी तालुक्यातील वट्रा खुर्द, वांगेपल्ली, सिरोंचा तालुक्यातील मादाराम रै. जाफ्राबाद चेक, सोमनपल्ली, तुमनूर माल, वडधम, बेजुरपल्ली, नडीकुडा या ग्रामपंचायंतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त
एकूण मतदान केंद्रांपैकी सुमारे २६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व २३ मतदार केंद्र संवेदनशील भागात आहेत. सदर मतदान केंद्र नक्षलदृष्ट्या संवेदनशील मानले जातात. त्यामुळे पोलिंग पार्ट्या पोहोचविण्यासह मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. २४ ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी एक हजार पोलीस जवानांपेक्षा अधिक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी बारिक लक्ष ठेवून आहेत.