बांधकाम विभागासाठी जोरदार रस्सीखेच

By admin | Published: November 6, 2014 01:35 AM2014-11-06T01:35:59+5:302014-11-06T01:35:59+5:30

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक २ आॅक्टोबर रोजी पार पडली.

Strong tactics for the construction area | बांधकाम विभागासाठी जोरदार रस्सीखेच

बांधकाम विभागासाठी जोरदार रस्सीखेच

Next

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक २ आॅक्टोबर रोजी पार पडली. मात्र अद्याप नवनिर्वाचित उपाध्यक्षासह दोन सभापतींना खातेवाटप झालेले नाही. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कारण देत हे खातेवाटप लांबणीवर टाकण्यात आले. आता १० नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची विशेष सभा या खातेवाटपावर चर्चा करण्यासाठी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बांधकाम खाते मिळविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने, काँग्रेसचे उपाध्यक्ष जीवन नाट यांना हाताशी धरून जोरदार मोर्चेबांधणी बांधकाम खाते मिळविण्यासाठी सुरू केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते व जिल्हा परिषदेचे विद्यमान कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनीही बांधकाम सभापती पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्यातरी या मोर्चेबांधणीत अतुल गण्यारपवार यांचे पारडे जड असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राज्यात अनेक जिल्हा परिषदांमध्ये उपाध्यक्ष पदावर असलेल्या सभापतीकडे कृषी व पशुसंवर्धन खाते दिल्या जाते. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषदेत अशी प्रथा आहे. परंतु गडचिरोली या मागास जिल्ह्यातील जिल्हा परिषद मात्र उपाध्यक्षांकडे प्रत्येकवेळी नवे खाते देण्याची परंपरा पाडून ठेवण्यात आली आहे. २०१२ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर उपाध्यक्षांकडे असलेले बांधकाम खाते काढून घेत ते अर्थ व नियोजन खात्याशी जोडण्यात आले व शिक्षण व आरोग्य अशा दोन खात्याची सांगड घालून ते उपाध्यक्षांना देण्यात आले. यावेळी अतुल गण्यारपवार यांनी सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा बंडखोर गट, आदिवासी विद्यार्थी संघ, नाग विदर्भ आंदोलन समिती, शिवसेना यांची मदत घेऊन काँग्रेसच्या मदतीने पद मिळविले. यात नाग विदर्भ आंदोलन समितीच्या सुवर्णा खरवडे महिला व बालकल्याण सभापती पदी निवडून आल्या. तर आदिवासी विद्यार्थी संघाचे जि.प. सदस्य अजय कंकडालवार हे व अतुल गण्यारपवार हेही निवडून आलेत. गेल्यावेळी अध्यक्षांच्या गटातील छायाताई कुंभारे यांच्याकडे बांधकाम सभापती पद होते. बांधकाम खात्यात मोठ्या प्रमाणावर गोंधळ झालेला आहे. एकाच गावाला अनेक कामांचा विकास निधी हेतुपुरस्सर देण्यात आला आहे. स्मशानभूमी विकास योजनेंतर्गतही ठराविक ग्रामपंचायतींना हा निधी देण्यात आला आहे. ग्रामसेवक आपल्या मर्जीतील आहेत. तर तेथे मोठ्या प्रमाणावर निधी द्यायचा व एकाच कामाला चार ते पाच योजनांमधून निधी दिल्या गेल्याचाही प्रकार जिल्हा परिषदेत घडलेला आहे. हे ग्रामसेवक ज्या गावात बदलून गेले. त्या गावावर पुन्हा निधी देताना बांधकाम विभाग मेहरबान झाल्याचेही दिसून येत आहे. एकूणच निधी वाटपात प्रचंड गोंधळाची परिस्थिती मागील अडीच वर्षात झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदारांवर लादलेला दंडही वादात आला होता. तो कमी करण्यासाठीही पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. एकूणच जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग गोंधळलेल्या स्थितीत आहे. अतुल गण्यारपवार यांच्याकडे बांधकाम खात्याचा कारभार गेल्यास जुने सारे चौकशीसाठी निघू शकते, अशी भीती मागील सत्ताधाऱ्यांना व संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची एक लॉबी गण्यारपवार यांना बांधकाम खाते मिळू नये, यासाठी पदाधिकारी व सदस्यांना हाताशी धरून जोरदार फिल्डींग लावून आहे व सदर बांधकाम विभाग जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट यांना दिला जावा, अशी व्यवस्था ते करीत आहेत. याला माजी जि.प. अध्यक्षांच्या मर्जीतील सदस्यांचेही समर्थन असल्याची चर्चा सध्या आहे. तर आदिवासी विद्यार्थी संघाला कृषी व पशुसंवर्धन सभापती पद देण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. सभागृहाच्या बहुमतानंतरच हे खातेवाटप होणार असून बांधकाम खाते मिळविण्यासाठी सुरू असलेली धडपड सध्या जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय आहे. गण्यारपवार यांच्याकडे यापूर्वी कृषी व पशुसंवर्धन खात्याचा भार होता. त्यांनी या खात्याला गेल्या अडीच वर्षात चांगला न्याय दिला. दुर्गम भागापर्यंत कृषी खात्याचे काम पोहोचविण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी केला होता. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Strong tactics for the construction area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.