हलाखीच्या परिस्थितीने तिला शिकविले काष्ठशिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:44 AM2018-03-22T00:44:21+5:302018-03-22T00:44:21+5:30
घरात अठराविश्वे दारिद्र्य, त्यातच वडिलांचा आजार, उपचारासाठी पैसे नाहीत. वडिलांच्या आजारामुळे काष्ठशिल्पाचा व्यवसाय ठप्प पडला. काय करावे तिला सुचेना.
संतोष बुकावन ।
ऑनलाईन लोकमत
अर्जुनी-मोरगाव : घरात अठराविश्वे दारिद्र्य, त्यातच वडिलांचा आजार, उपचारासाठी पैसे नाहीत. वडिलांच्या आजारामुळे काष्ठशिल्पाचा व्यवसाय ठप्प पडला. काय करावे तिला सुचेना.आपला व्यवसाय मुलीने पुढे न्यावा हे वडिलांना मान्य नव्हते. तरीही इतरांसमोर पदर पसरण्यापेक्षा आपणच या व्यवसायात कष्ट करुन हलाखीच्या परिस्थितीवर मात करायची. या निर्धाराने पेटून उठलेली प्रियंका अखेर उत्कृष्ट काष्ठशिल्पकार बनली. परिस्थितीच माणसाला घडविते ही तिची शिकवण समाजाला आदर्श व प्रेरणा देणारी ठरत आहे.
प्रियंका विनोद बोरकर ही मूळची गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील किटाळी येथील रहिवासी आहे. लग्नानंतर ती अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथे वास्तव्यास आहे. तिने कुठलंही काष्ठशिल्पाचं शिक्षण घेतलेलं नाही. दहावीची परीक्षा सुरु असताना वडील आजारी पडल्याने तिला पुढे शिक्षण घेता आले नाही. ती दहावीत नापास झाली. अवघी १५ वर्षाची असताना वडील आजारी पडले. वडीलांचे हे काष्ठाशिल्पाचे गुण आपणही आत्मसात करावे. अशी महत्वाकांक्षा तिच्या मनात जागृत झाली. तीने टाकाऊ सागवन जडीपासून सहजच एक झाड तयार करण्याचा प्रयत्न केला. तिने तयार केलेली ती प्रतिकृती पाचशे रुपयात विकली गेली. पुढे पुढे तिला यात आवड निर्माण होत गेली.
ती पुढे नवनवीन कलाकृती तयार करायला लागली. यात आई, भाऊ व बहिणी यांचीही मदत मिळू लागली. तयार झालेले सर्व साहित्य ते गडचिरोली येथे विक्रीला घेऊन जायचे. तेव्हा वडील अंथरुणालाच खिळले होते. गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यात या काष्ठशिल्पांना पाहिजे तशी मागणी नाही. त्यांचे साहित्य विकतच नव्हते. वडीलांचा आजार व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा यक्षप्रश्न प्रियंका व तिच्या कुटुंबासमोर होता. तेव्हा त्यांना एक देवदूतच मिळाला. गडचिरोलीच्या तत्कालीन जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने तिला कार्यालयात बोलावले. तिने तयार केलेले काष्ठशिल्प बघून त्यांनी प्रसंशा केली व आस्थेने कलाकृतीविषयी जाणून घेतले. त्यांनी चार हजारात या कलाकृती विकत घेतल्या व एक हजाराचे पारितोषिक असे एकूण पाच हजार रुपये दिले. माझ्यासाठी हे पैसे अमुल्य होते. या पैशांच्या मदतीने वडीलांच्या आजारावर उपचार होऊन ते बरे झाले. हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा सुखद धक्का देणारा अनुभव असल्याचे प्रियंकाने लोकमतशी बोलताना सांगितले. यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्टÑातील काही पोलीस अधिकारी आले. त्यांनीही प्रियंकाच्या कलाकृतींची प्रसंशा करत त्या विकत घेवून सहकार्य केले.
यादरम्यान तिने मुंबई, जगन्नाथपुरी, भंडारा, पुणे, हैद्राबाद अशा अनेक ठिकाणच्या प्रदर्शनीत सहभाग घेवून पारितोषिक प्राप्त केले. तिला गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कारही मिळाला आहे.
पतीची मिळाली साथ
सन २००९ मध्ये प्रियकांचे लग्न झाले. लग्नानंतर सुमारे पाच वर्षे तिने हा व्यवसाय केला नाही. मात्र तिच्यातील कला तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने पती विनोद बोरकर यांची संमती घेवून काष्ठाशिल्प कलाकृती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीची खरेदी केली. ती पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली. झाडावर बसलेला मोर, लहान पक्षी, फुलपाखरु, बगळे, गरुड, सारई, मासोळी, जलपरी, १० रुपयाच्या कागदी चलनावरील वाघ व गजराजची प्रतिमा, हातात नागर धरुन असलेला शेतकरी, हरिण, कासव, पोपट अशा विविध कलाकृती ती सागवनाच्या लाकडावर तयार करते.
अडचणीवर केली मात
लाकुड तासणे, कोरणे करवतीने कापणे हे काम थोडेसे मेहनतीचे आहे. एक महिला ही कामे करते याविषयी काहींच्या मनात कुतूहूल असते तर काही लोक उपहासात्मक बोलतात. मात्र प्रियंकाने या सर्व बाबींना बाजूला सारत एक महिला सुद्धा पुरुषांपेक्षा कमी नाही हे यातून दाखवून दिले आहे. आता हा व्यवसाय तिच्या जीवनाचा आधार बनला आहे. हे कार्य करीत असताना तिला काही अडचणीना तोंड द्यावे लागले. वेळेवर सागवन लाकूड उपलब्ध होत नाही. त्यातही या कामासाठी सागवान वृक्षाची खोडी लागते. वृक्ष तोड करणारे कंत्राटदार हे सागवान वृक्ष तोडतात. मात्र खोडी काढत नाही त्यामुळे अडचण निर्माण होते. वनविभागाने ते उपलब्ध करुन दिल्यास आणखी या व्यवसायाला बळ मिळेल.
पेंटिंग आणि मातीच्या मूर्ती...
प्रियंकामध्ये आणखी काही कलागुण आहेत.तिला उत्तम पेंटींग करता येते. मातीच्या मूर्त्या व बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू तिला तयार करता येतात. शासनाने या तयार झालेल्या वस्तूंची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे औदार्य दाखविल्यास हा व्यवसाय आणखी भरभरटीला येऊ शकतो.
काष्ठशिल्प व्यवसायाला अवकळा
टाकाऊ लाकडापासून उपयुक्त व सुशोभित वस्तू तयार करण्याच्या उद्देशाने लाकडास रुप व आकार दिला जातो. कलाकुसरीच्या वस्तूनिर्मितीसाठी मौल्यवान टाकाऊ सागवान लाकडाचा वापर केला जातो. कोरीव कामाला मऊ लाकडाचा वापर केला जातो. या लाकडाला करवतीने कापून, कोरुन, तासून, जोडून वस्तु निर्मिती केली जाते. यात पक्षी, लहान मुलांची खेळणी, शोभीवंत वस्तू तयार केल्या जातात. प्लास्टिकची तसेच चिनी खेळण्यांचे बालकांना आकर्षण आहे. त्यामुळे लाकडाची पारंपारिक खेळणी बाजारातून नाहीशी झाली आहेत. त्यामुळे या व्यवसायावर संकट व कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे.