कारभारी व सहकारी बनण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पोटनिवडणुकीचा महासंग्राम
By गेापाल लाजुरकर | Published: April 25, 2023 11:33 AM2023-04-25T11:33:45+5:302023-04-25T11:35:45+5:30
८१ ग्रा.पं.मध्ये १४९ जागा : आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल होणार
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानुसार जिल्ह्यातील एकूण ८१ ग्रामपंचायतीच्या १४९ जागांवर १८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. यासाठी मंगळवार २५ एप्रिलपासून सार्वजनिक सुट्टी वगळून नामनिर्देशनपत्र इच्छुकांकडून मागविले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत रिक्त झालेल्या ग्रा.पं. सदस्य व थेट सरपंच पद निवडीसाठी पोटनिवडणूक होणार आहे. रिक्त जागांवर पोट निवडणुकीची संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांनी मंगळवार १८ एप्रिल रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला. जिल्ह्यात एकूण १४९ जागांसाठी पोटनिवडणूक होत असून यामध्ये सर्वाधिक धानोरा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतमधील ३७ पदे आहेत. त्याखालोखाल एटापल्ली तालुक्यातील ११ ग्रामपंचायतमधील २८ जागा तर सिरोंचा तालुक्यातील १२ ग्रा.पं. मधील २४ जागांसाठी निवडणूक होईल. सर्वात कमी म्हणजे एक जागा देसाईगंज तालुक्यातील असून ती कुरूड येथील आहे.
थेट सरपंच पदासाठी चढाओढ
गडचिरोली जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींचे सरपंच विविध कारणांनी अपात्र ठरले तर काही ठिकाणी थेट सरपंचाची निवड झाली नव्हती. अशा सर्व जागांवर पोट निवडणूक होत आहे. परंतु सदस्यांपेक्षा थेट सरपंच पदासाठी रिक्तपद असलेल्या सर्वच ग्रामपंचायतमध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये आतापासूनच चढाओढ सुरू आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा किंवा सादर करण्याचा दिनांक व वेळ (संबंधित तहसील कार्यालयाचे ठिकाण) मंगळवार २५ एप्रिल ते मंगळवार २ मे २०२३, वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजतापर्यंत (२९, ३० एप्रिल व १ मे मे राेजीची सार्वजनिक सुट्टी वगळून) नामनिर्देशनपत्र छाननी बुधवार ३ मे सकाळी ११ वाजतापासून सुरू होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ ८ मे दुपारी ३ वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देणे तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी ८ मे दुपारी ३ वाजतानंतर प्रसिद्ध केली जाईल. आवश्यक असल्यास गुरूवार १८ मे रोजी सकाळी ७:३० ते दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. तर शनिवार २० मे राेजी संबंधित तहसील कार्यालयात मतमाेजणी होईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले.
गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्य व थेट सरपंच पदाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता मतदान करावे.
- संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली