जातीय विषमता मोडून संघर्ष करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 10:39 PM2019-01-06T22:39:49+5:302019-01-06T22:40:17+5:30
अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली/ देसाईगंज : अनादी काळापासून समाजात जातीयवादाचे विष पेरून माणसाला माणसापासून वेगळे केले जात आहे. यातून मिळवलेल्या सत्तेच्या बळावर बहुजनांना गुलाम बनवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. याप्रती जागृत होऊन समाजात पसरविली जाणारी जातीयवादी विषमता मोडीत काढावी. आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करायला तयार राहावे, असे प्रतिपादन ओबीसी बहुजनवादी वक्ते अमोल मिटकरी यांनी केले.
गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल व देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या आवारात समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. गडचिरोली येथील कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमोल मिटकरी यांच्यासह मूलनिवासी महिला संघ भंडाराच्या जिल्हाध्यक्ष शरयू डहाट होत्या. अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून माळी महिला संघटनेच्या अध्यक्ष सुधा चौधरी, मुख्याधिकारी संजीव ओहोळ होते. गडचिरोली येथील कार्यक्रम राष्टÑीय ओबीसी महासंघ सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, बामसेफ, महिला मैत्री संघ, भारिप बहुजन महासंघ, बीआरएसपी, भारतीय विद्यार्थी मोर्चा, आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडिया, बीआरव्हीएम यांच्या वतीने करण्यात आले होते.
देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या आवारात ओबीसी तालुका संघटनेच्या वतीने आयोजित सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम होते. उद्घाटन मुरलीधर सुंदरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी धनपाल राऊत, सरपंच मारोती बघमारे, प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, कमलेश बारस्कर, ममता जांभुळकर उपस्थित होते.
पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, रयतेचे राजे शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज यांना आपले गुरु मानत होते. स्वराज्याची स्थापना करताना त्यांनी जातीयवादाला कदापी थारा दिला नाही. शिक्षणाचे आद्यजनक महात्मा जोतिबा फुले व त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सावित्रीबाई फुले यांनी जातीयवादाला थारा न देता शिक्षणामुळेच अज्ञानावर मात करता येणे शक्य असल्याचे ओळखून सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिताना ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी त्यांची भागीदारी, या तत्वावर सर्वांना समता बंधुता व न्याय या सूत्रात बांधून भविष्यातही जातीयवाद उफाळून येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. आपल्या संत महात्म्यांनी आपल्या प्रबोधनातुन जातीयवादावर कट्टर प्रहार करत समाजात फक्त मानवता रुजवण्याचा प्रयत्न केला होता, असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला देसाईगंज तालुक्यातील कुणबी, कोहळी, माळी, तेली, नाभिक, सुतार, लोहार, सोनार, परीट, श्रमिक समाज संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. संचालन प्रदीप तुपटे, प्रास्ताविक प्रा. दामोदर शिंगाडे तर आभार दिलीप नाकाडे यांनी मानले.