गडचिरोली : कुनघाडा येथे वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू
By संजय तिपाले | Published: March 18, 2023 06:58 PM2023-03-18T18:58:19+5:302023-03-18T19:06:56+5:30
ही घटना चामोर्शी तालुक्यातील कुनघाड येथे घडली.
गडचिरोली/चामोर्शी: जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली असून, १८ मार्चला पहिल्याच दिवशी वीज कोसळून एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना चामोर्शी तालुक्यातील कुनघाड येथे घडली.
स्विटी बंडू सोमनकर (१६, रा.मालेरचक, कुनघडा ता.चामोर्शी) असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कुनघाडा येथे विश्वशांती विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होती. दहावी, बारावी परीक्षा सुरू असल्याने, शाळा सकाळच्या सत्रात भरते.
नित्याप्रमाणे स्विटी सकाळी सात वाजता सायकलवरून शाळेत गेली. सकाळी साडेनऊ वाजता शाळा सुटली. त्यानंतर, ती घरी परतण्यास निघाली. याच वेळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वाटेत तिच्या अंगावर वीज कोसळली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तलाठी एन.एम. मेश्राम यांनी पंचनामा केला. दरम्यान, स्विटी सोमनकर हिच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला.
भाजीपाला पिकांना जबर फटका
गडचिरोली व परिसरात १८ रोजी सकाळी आठ वाजताच अवकाळी पावसाने हजेरी लावली. नंतर पावसाचा जोर वाढला होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते, त्यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. या पावसाचा मिरची, टोमॅटो व कडधान्य पिकांना मोठा फटका बसला आहे.