विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
By admin | Published: September 29, 2016 01:40 AM2016-09-29T01:40:27+5:302016-09-29T01:40:27+5:30
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत येरमागड येथील आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर
येरमागड आश्रमशाळा : विद्यार्थी मृत्यू प्रकरणानंतर कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत येरमागड येथील आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्याचा आजाराने मृत्यू झाल्यानंतर गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारी अचानक येरमागड आश्रमशाळेला भेट देऊन तेथील व्यवस्थांची पाहणी केली. तसेच आरोग्य शिबिर लावून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान चार विद्यार्थ्यांना डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे आढळून आले. यामध्ये ममीता माधव होळी, अशवंती मधुकर पोरेटी, करिना आनंदराव मडकाम, रूपाली यशवंत कुंभरे या विद्यार्थिनींचा समावेश आहे. येरमागड आश्रमशाळेचा विद्यार्थी रजनूू बुतेकर धुर्वे या विद्यार्थ्याचा २६ सप्टेंबर रोजी सोमवारला आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर येथीलच विद्यार्थी अलिराम तुमरेटी याची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर पुन्हा आशिक राजेश हिडामी या विद्यार्थ्याला पोटदुखी व उलटीचा त्रास होऊ लागला. येरमागड आश्रमशाळेत आरोग्याची प्रचंड समस्या ऐरणीवर आली असल्याचे पाहून गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी येरमागड आश्रमशाळेला भेट दिली.
विद्यार्थी आशिक हिडामी याने एकाच दिवशी दीड किलो शेंगदाणे खाल्याने त्याची प्रकृती बिघडली, असे तपासणीत आढळून आले. सदर आश्रमशाळेतील खाद्यपदार्थाचे नमूने तपासणीसाठीही पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती प्रकल्प अधिकारी दिवेगावकर यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश दिवेगावकर यांनी येरमागड आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना यावेळी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)