मालवाहू वाहनाने विद्यार्थ्यांचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:40 AM2018-07-25T00:40:29+5:302018-07-25T00:42:20+5:30
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे. हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे.
रामचंद्र कुमरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर (गडचिरोली) : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरातील बससेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनाच्या मदतीने दररोज शाळा गाठावी लागत आहे.
हा परिसर जंगलाने व्यापला आहे. झिंगानूर हे परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र अकरावीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सिरोंचा या तालुकास्थळी गेल्याशिवाय पर्याय नाही. झिंगानूर येथील आश्रमशाळेत बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय करावी, अशी मागणी अनेकवेळा होत असली तरी प्रशासन व शासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी दहावी पास झाल्यानंतर सिरोंचा येथे प्रवेश घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सिरोंचा ते झिंगानूरपर्यंतचे अंतर ४० किमी आहे. या ४० किमी अंतरात अनेक नाले व लहान नद्या आहेत. या नाल्यांवर अजूनही पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसात नाल्याच्या ठेंगण्या पुलावरून पाणी राहते. परिणामी विद्यार्थ्यांना अर्ध्यावरूनच परत यावे लागते. काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून पुढचा प्रवास करतात. यावर्षी बांधकाम विभागाने काही नाल्यांवर पुलाचे बांधकाम सुरू केले. नागरिकांना ये-जा करण्यासाठी बाजूने रस्ता केला आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल निर्माण झाला आहे. बससह जड वाहने फसत असल्याने एसटी विभागाने झिंगानूरला जाणारी बस १७ जुलैपासून बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मालवाहू वाहनातून सिरोंचा गाठावे लागत आहे. बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांनाही मालवाहू वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
झिंगानूर येथील आश्रमशाळेत परिसरातील काही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यांनाही नदी, नाल्यांचा सामना करत सिरोंचा गाठावे लागते. कोरेतोगू नाल्यावरील पुलाच्या बाजूने तयार केलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळेच बस फेरी बंद करण्यात आली. परिणामी सर्वांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना या भागातील नागरिक अद्याप प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत.