आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना भारत भ्रमणाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 01:09 AM2018-09-27T01:09:46+5:302018-09-27T01:13:52+5:30
आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाअंतर्गत जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, गडचिरोली या तिनही प्रकल्पातून शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या गुणवत्ताप्राप्त ४४ विद्यार्थ्यांना टी.एस.पी. योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या जिल्हा नावीण्यपूर्ण उपयोजनेतून प्रथमच भारत भ्रमणाची संधी प्राप्त झाली आहे. सहलीतील या ४४ आदिवासी विद्यार्थ्यांना विमानवारीही घडणार आहे.
गडचिरोली प्रकल्पात २४, अहेरी ११, भामरागड ८ अशा एकूण ४४ शासकीय आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमध्ये यावर्षी शिकणाºया इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीत सहभागी होता येणार आहे. या सहलीदरम्यान दिल्ली येथील कुतुबमीनार, लोटस टेम्पल, लाल किल्ला, राष्टÑपती भवन, संसद भवन, राजघाट, स्पोर्ट अॅथोरेटी आॅफ इंडिया, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम, आग्रा येथील ताजमहल, आग्रा किल्ला, फत्तेपूर शिकरी, जयपूर येथील प्रेक्षणीय स्थळे पाहायला मिळणार आहे. याशिवाय सहलीतील विद्यार्थी राष्टÑपती, प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, आदिवासी विकास मंत्री आदींची भेट घेणार आहेत.
मागील वर्षी शासकीय आश्रमशाळेत इयत्ता सातवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या व वर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुला, मुलींची ३० सप्टेंबरला दुपारी १२ ते १ दरम्यान प्रकल्पस्तरावर निवड चाचणी होणार आहे. गडचिरोली प्रकल्पातील विद्यार्थ्यांची निवड चाचणी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत तर अहेरी व भामरागड प्रकल्पातील विद्यार्थ्यांची परीक्षा आलापल्ली येथे होणार आहे. सदर निवड परीक्षेतून ४४ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची भारत भ्रमण सहलीसाठी निवड करण्यात येणार आहे. यामध्ये २२ मुले व २२ मुलींचा समावेश राहणार आहे. सदर परीक्षेला गडचिरोली प्रकल्पातील १९०, अहेरी प्रकल्पातील ८८ व भामरागड प्रकल्पातील ६४ असे एकूण ३४२ विद्यार्थी बसणार आहेत.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओंबासे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या प्रयत्नाने प्रथमच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेच्या माध्यमातून भारत भ्रमणाची संधी मिळणार असून त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. आदिवासी विकासाच्या वतीने प्रथमच असा उपक्रम राबविला जात आहे.