बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्याचे हाल
By admin | Published: July 22, 2016 01:24 AM2016-07-22T01:24:26+5:302016-07-22T01:24:26+5:30
एटापल्ली शहरासह आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज आलापल्ली व अहेरी येथे ये-जा करतात. विद्यार्थी दररोज सकाळी १० वाजता...
अनेकांना घरी परतावे लागले : शाळेच्या वेळेत बस द्या; पालकांची मागणी
एटापल्ली : एटापल्ली शहरासह आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज आलापल्ली व अहेरी येथे ये-जा करतात. विद्यार्थी दररोज सकाळी १० वाजता जारावंडी-एटापल्ली-अहेरी या बसने जात होते. विद्यार्थ्यांनी बससाठी एसटीची पासही काढली होती; मात्र काही दिवसांपासून ही बसफेरी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे.
सध्या विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करून खासगी वाहनाने जावे लागत आहे. अनेकदा अधिकच उशीर झाल्यास शाळेत न जाता घरी परतावे लागत आहे. खासगी वाहनात प्रवाशी कोंबून जात आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागतो. खासगी वाहनात सर्व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक शासकीय कर्मचारीही अहेरी व आलापल्लीच्या कार्यालयात याच बसगाडीने येतात. त्यांच्यातही सध्या नाराजीचा सूर आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून अहेरी-एटापल्ली ही सकाळी ९ वाजताची बसफेरी सुरू करावी, सदर बस १० वाजता एटापल्लीवरून परत जाऊ शकते किंवा बंद झालेली जारावंडी-अहेरी ही बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नागुलवाही परिसरातही बसअभावी पायपीट
मुलचेरा : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमुळे सुविधा उपलब्ध होते. मात्र मुलचेरा तालुक्यात नागुलवाही, मच्छीगट्टा, मरपल्ली येथील नागरिकांना एसटी बसअभावी ८ किमीची पायपीट करावी लागत आहे. मुलचेरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या तिन्ही गावातील रस्त्यावर एसटी धावलेली नाही. या गावातील नागरिकांना कोर्ट कचेरीच्या कामासाठी मुलचेरा येथे यावे लागते. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लगाम येथे जावे लागते. लगामपासून ८ किमी अंतरावर असलेल्या या गावातील नागरिकांना बससेवेचा लाभ मिळत नसल्याने लगामपर्यंत पायीच प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात मोठे हाल होतात. अहेरी आगाराने प्रायोगिक तत्त्वावर अहेरी-लगाम-नागुलवाही ही यशवंती बस सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)