विद्यार्थ्यांनी रॅलीतून घडविले महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन, गडचिराेलीकरांचे पारणे फिटले

By दिलीप दहेलकर | Published: December 31, 2023 07:37 PM2023-12-31T19:37:22+5:302023-12-31T19:37:40+5:30

धार्मिक सलोखा, एकात्मता, पर्यावरण जागृतीवर भर

Students created a vision of Maharashtrian culture through the rally | विद्यार्थ्यांनी रॅलीतून घडविले महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन, गडचिराेलीकरांचे पारणे फिटले

विद्यार्थ्यांनी रॅलीतून घडविले महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन, गडचिराेलीकरांचे पारणे फिटले

गडचिरोली: दहा दिवसीय राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर 'आव्हान' गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. आजच्या सातव्या दिवशी राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हानची रॅली आरमाेरी मार्गावरील सभागृहापासून शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत निघाली. तत्पूर्वी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी मशाल पेटवून तसेच रॅलीला हिरवा झेंडी दाखवून रवाना केले. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रॅलीतून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले.

शुभारंभाप्रसंगी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, गोडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक तथा शिबिराचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे, सहसमन्वक डॉ. प्रिया गेडाम, एनडीआरएफचे निरीक्षक पंकज चौधरी, नागपूर विद्यापीठाचे परीक्षक सतिश चाफले, जळगाव विद्यापीठाचे परीक्षक सचिन नाद्रे, नागपूर विद्यापीठाचे रासेयो संचालक सोपानदेव पिसे, गडचिरोली जिल्हा रासेयो समन्वयक डॉ.श्रीराम गहाणे, चंद्रपूर जिल्हा समन्वयक विजया गेडाम, विभागीय समन्वयक उषा खंडाळे, डॉ. पवन नाईक, डॉ. गुरुदास बल्की,प्रदीप चाफले आदी उपस्थित होते.
धार्मिक सलोखा, एकात्मता, भारतीय संविधान, वारकरी संप्रदाय, विज्ञान तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती, पर्यावरण, मतदान जागृती अशा अनेक विषयांची हाताळणी करणारे देखावे, नृत्य, पोस्टर्स, विविध विषयांवरील फलक आणि सजीव देखावे या वेळेला राज्यातील विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केले. यातून विविधतेतून एकता आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.

वाहतुकीला कुठलीही अडचण निर्माण न होऊ देता अगदी व्यवस्तीतरित्या ही रॅली आरमाेरी मार्गावरून इंदिरा गांधी चौक, पुढे शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत पुन्हा सभागृहात विसर्जित करण्यात आली. या संपूर्ण रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. महाराष्ट्राच्या २२ विद्यापीठांमधील एक हजार विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. यामध्ये ३७ पुरुष संघ व्यवस्थापक, ३७ महिला संघ व्यवस्थापकांचा समावेश होता. रॅलीच्या यशस्वीसाठी विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

समाजसेवकांची साकारली वेशभूषा
या रॅलीत गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रेला नृत्य तसेच समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांची वेशभूषा , झाडीपट्टी रंगभूमीवर पोस्टर, डाॅ. अभय बंग, बाबा आमटे यांचे कार्य, जल, जंगल, जमीनचे महत्व, या भागातील सांस्कृतीक वारसा, येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडविले.

Web Title: Students created a vision of Maharashtrian culture through the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.