युवकासह विद्यार्थ्याचा विषारी दारूने मृत्यू?, कामावरून परतल्यानंतर बिघडली प्रकृती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 07:27 PM2019-02-15T19:27:37+5:302019-02-15T19:27:47+5:30
शेजारच्या गावातून कामावरून परतल्यानंतर एका युवकासह दहावीतील विद्यार्थ्याची प्रकृती बिघडून त्यांचा उपचार मिळण्याआधीच मृत्यू झाला.
कोरेगाव चोप (गडचिरोली) : शेजारच्या गावातून कामावरून परतल्यानंतर एका युवकासह दहावीतील विद्यार्थ्याची प्रकृती बिघडून त्यांचा उपचार मिळण्याआधीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री देसाईगंज तालुक्यातील बोडदा या गावी घडली. गोपाल कोमराम शिंदे (२५) आणि स्वप्नील देवानंद डहारे (१६), दोघेही रा.बोडदा अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही बोडदापासून २ किलोमीटरवर असलेल्या नदीपलिकडील गोंदिया जिल्ह्यातल्या गावात कामासाठी गेले होते.
गोपाल हा धानाच्या कोंडा डुलाईसाठी तर स्वप्नील विटांच्या डुलाईसाठी गेला होता. सायंकाळी दोघेही कामावरून घरी परतल्यानंतर त्यांच्या पोटात दुखू लागले आणि त्यांना भोवळ आली. त्यामुळे त्यांना ब्रह्मपुरी येथे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. नदीपलीकडील गावात हातभट्टीची दारू गाळली जाते. सदर दोघांनीही कामावरून घरी परतण्यापूर्वी दारू प्राशन केल्याची चर्चा आहे. प्रकृती बिघडल्यानंतर दोघांचीही लक्षणं सारखीच होती.
अनेक विद्यार्थी व्यसनपूर्तीसाठी शाळेत न जाता कामावर जाऊन पैसे कमावतात आणि ते व्यसनांमध्ये उडवतात, अशा आशयाचे वृत्त काही दिवसांपूर्वीच लोकमतने प्रकाशित केले होते. मात्र दारू गाळणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी दुपारी दोघांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. स्वप्नील हा किसान विद्यालयात दहाव्या वर्गात शिकत होता तर गोपाल विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी व आई-वडील असा परिवार आहे. याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून बीट अंमलदार अशोक क-हाडे अधिक तपास करीत आहे.