शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:56 AM2018-07-26T00:56:52+5:302018-07-26T00:57:31+5:30
पंचायत समितीअंतर्गत मोहली येथील मॉडेल स्कूलमध्ये पाच वर्गांना शिकवण्यासाठी सध्या एकच शिक्षक असल्याने शिक्षकांच्या मागणीसाठी बुधवारी चक्क विद्यार्थ्यांनीच पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. शिक्षकांची आॅर्डर काढल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेत अखेर विद्यार्थ्यांनी चार शिक्षक मिळविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : पंचायत समितीअंतर्गत मोहली येथील मॉडेल स्कूलमध्ये पाच वर्गांना शिकवण्यासाठी सध्या एकच शिक्षक असल्याने शिक्षकांच्या मागणीसाठी बुधवारी चक्क विद्यार्थ्यांनीच पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला. शिक्षकांची आॅर्डर काढल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेत अखेर विद्यार्थ्यांनी चार शिक्षक मिळविले.
जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या मोहली येथील मॉडेल स्कूलमधील ६ शिक्षकांपैकी ५ शिक्षकांची इतरत्र बदली झाल्यानंतर ५ वर्गांची जबाबदारी एकाच शिक्षकावर येऊन पडली. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू झाला. पालकांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे एवढेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांकडेही निवेदने दिली. मात्र शिक्षक देण्यासाठी कोणीही हालचाल केली नाही. नवीन सत्र सुरू होऊन एक महिना लोटला तरी परिस्थितीत बदल होत नसल्यामुळे बुधवारी (दि.२५) जवळपास २०० विद्यार्थी धानोऱ्यात दाखल झाले. ‘वुई वाँट टिचर, शिक्षक नाही तर शिक्षण नाही’ असे फलक घेऊन आणि घोषणा देत हे विद्यार्थी बस स्थानक चौकातून पंचायत समितीवर धडकले. अखेर अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत शिक्षक देण्याची कार्यवाही केल्याने विद्यार्थी शांत झाले.
सदर मॉडेल स्कूल सर्व व्यवस्थेसह सुरू करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेता दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली.
अन् अधिकाऱ्यांनी ंिदला चार शिक्षकांच्या नियुक्तीचा आदेश
विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहून संवर्ग विकास अधिकारी यशवंत भांड यांनी ताबडतोब गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांना विचारणा केली. त्यानंतर चार शिक्षकांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले. मात्र बदली आदेश मिळाल्याशिवाय जाणार नाही असा आग्रह विद्यार्थ्यांनी धरला तेव्हा चार शिक्षकांच्या तात्पुरत्या बदलीचा आदेश काढण्यात आला. विद्यार्थ्यांचे त्यांचे आभार मानत ते माघारी परतले.