विद्यार्थ्यांनी उलगडले यशाचे रहस्य
By admin | Published: June 18, 2017 01:16 AM2017-06-18T01:16:24+5:302017-06-18T01:16:24+5:30
अभ्यासात यशस्वी होऊन चांगले मार्क्स घ्यायचे असेल तर अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून जाऊन चालणार नाही.
दहावी-बारावीतील गुणवंतांचा सत्कार : अभ्यासाची पद्धत आणि त्यातील अडचणींवर टाकला प्रकाश
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अभ्यासात यशस्वी होऊन चांगले मार्क्स घ्यायचे असेल तर अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून जाऊन चालणार नाही. अभ्यास गांभीार्यानेच करा, पण गंभीर होऊन करू नका. अभ्यासही ‘एन्जॉय’ करा. आवडीचे खेळ खेळा, मनोरंजनही करा, पण तेव्हा अभ्यासाला बसाल तेव्हा पूर्णपणे त्यावर लक्ष केंद्रित करा, असा मोलाचा सल्ला जिल्ह्यातून दहावी-बारावीत यशाचे शिखर गाठणाऱ्या गुणवंतांनी दिला.
लोकमत मीडिया लि.च्या वतीने यावर्षी दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी येथील कार्मेल हायस्कूलच्या सभागृहात केले होते. यावेळी नव्यानेच रुजू झालेले प्राचार्य फादर जिग्नेश, लोकमतचे कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने यांच्यासह गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बारावीत जिल्ह्यातून प्रथम आलेल्या कार्तिकेय शंकरराव कोरंटलावार, दहावीत जिल्ह्यातून प्रथम आलेली नम्रता देवेंद्र रायपुरे, द्वितीय आलेली वैदवी गोपाल सिंगरेड्डीवार, चामोर्शी, तृतीय मयूर निळकंठ भांडेकर तसेच चामोर्शी येथील आयुष संतोष सुरावार याचे वडील आणि व्यवसायाने शिक्षक असणारे संतोष सुरावार यांचा लोकमतच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मनोज ताजने यांनी तर संचालन लोकमत बालविकास मंचच्या संयोजिका किरण पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी लोकमत सखी मंचच्या संयोजिका रश्मी आखाडे, गीता मसराम, लोकमतचे प्रतिनिधी दिगांबर जवादे, दिलीप दहेलकर, सहायक अमोल श्रीकोंडावार आदींनी सहकार्य केले. दहावी, बारावीच्या परीक्षेत सूयश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी, अभ्यासाचे केलेले नियोजन यांची माहिती इतर विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी कार्यक्रम सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
मित्रपरिवार असावाच, पण तो कसा हे महत्त्वाचे
दहावीचा अभ्यास आहे म्हणून एक्सट्रा करिक्युलर अॅक्टिीव्हिटीजकडे दुर्लक्ष करू नये. विरंगुळ्यासाठी प्रत्येकाने एकतरी छंद जोपासावा. खेळण्याने, विरंगुळ्याने मन ताजेतवाने होते. जगाच्या नेहमी एक पाऊल पुढे राहण्याची उर्मी आपण बाळगून त्यानुसार प्रयत्न केले पाहिजेत. दहावी-बारावीत मित्रांपासून दूर राहण्याचा सल्ला घरचे लोक देतात. पण हे चुकीचे आहे. मित्र असावेच, पण ते चांगले असावे. अभ्यासाची चर्चा करणारे असावे. ते वेगळ्या वळणावर जाणारे असतील त्यांच्यापासून दूरच राहा, असा सल्ला बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम आलेल्या कार्तिकेय कोरंटलावार याने दिला.
थकवा आला, बिनधास्त झोपा
नवव्या वर्गापर्यंत अभ्यासाबाबत फारशी गंभीर नसलेल्या वैदवीला पालकांनी याबाबत जागृत केले. दहावीची परीक्षा असल्याने तिनेही अभ्यासाकडे लक्ष दिले. दिवसभर शाळा, त्यानंतर ट्युशन राहात असल्याने सायंकाळी शारीरिकदृष्ट्या थकून जात होती. त्यामुळे आराम केल्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक राहत नव्हता. अशावेळी अभ्यासाला बसून उपयोग नाही. थकवा आला तर थोडा आराम करा, झोपा. नंतर उठून पुन्हा नव्या दमाने अभ्यासाला सुरूवात करा. यामुळे अभ्यासाला जास्त वेळ लागणार नाही, असे वैदवी म्हणाली.
दहावी व बारावीच्या वर्गात जास्तीत जास्त गुण घ्यायचे असेल तर प्रत्येक विषयाकडे समान लक्ष घालून त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. एखादा विषय आपल्याला आवडत नाही किंवा कठीण वाटतो म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या विषयाचा अधिक अभ्यास करावा लागेल. प्रत्येकाने दिवसातून किती तास अभ्यास करावा हे त्याच्या बुद्ध्यांकावर अवलंबून असते. त्यामुळे दुसऱ्याच्या अभ्यासाची तुलना आपल्याबरोबर करू नये. स्वत:च्या वेळेनुसार व सोयीनुसार अभ्यासाच्या वेळेची निवड करून जास्तीत जास्त अभ्यास करावा.
नववी व दहावीच्या अभ्यासाचा फायदा मुख्यत्वे अकरावी व बारावीच्या अभ्यासादरम्यान होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नववी व दहावीच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे. ज्या दिवशीचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करावा. यामुळे अभ्यासात सातत्य राहण्यास मदत होईल. शिक्षकांचे मार्गदर्शन व सल्ला जरूर घ्यावा मात्र पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहू नये. कारण परीक्षा शेवटी आपल्याला द्यायची आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी.
- कार्र्तिकेय कोरंटलावार
अभ्यासात आपल्या मित्रांच्या नेहमी पुढे राहण्याची जिद्द बाळगा. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन अभ्यास करण्याची आवड वाढेल. कठीण वाटत असलेल्या संकल्पना सोडविण्यासाठी शिक्षकांचा सल्ला घ्या. परीक्षेत एखादा पेपर चांगला न गेल्यास निराश न होता दुसऱ्या पेपरचा अभ्यास करावा. एकेका गुणासाठी संघर्ष करावा व त्यासाठी नियोजन करावे, असे मनोगत मयूर भांडेकर मांडले.
- मयूर भांडेकर
आधीपासून अभ्यासात मागे असणारे, नववीपर्यंत पहिल्या पाचमध्येही न राहणारी वैदेवी दहावीत जिल्ह्यात द्वितीय आली. याबद्दल सांगताना ती म्हणाली, माझ्या बहीणीला दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळाले होते. तिच्यापेक्षा अधिक गुण मिळावे अशी आपली जिद्द होती. त्यानुसार आपण अभ्यास केला व आपल्याला यश मिळाले, असे वैदवीने सांगितले. अनेक विद्यार्थी मुळात हुशार असतात, पण ते अभ्यासात लक्ष देत नसल्यामुळे ते मागे राहतात असेही तिने सांगितले.
- वैदवी सिंगरेड्डीवार