विद्यार्थ्यांचे दुपारचे भोजन घरच्या डब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:36 AM2017-12-30T00:36:07+5:302017-12-30T00:36:21+5:30

केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील २०७ शाळांमध्ये आहार बनविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही.

Students' lunch is at home | विद्यार्थ्यांचे दुपारचे भोजन घरच्या डब्यावर

विद्यार्थ्यांचे दुपारचे भोजन घरच्या डब्यावर

Next
ठळक मुद्देअहेरी तालुक्यातील वास्तव : तांदूळ व कडधान्य पुरवठ्याअभावी योजना ठप्प

विवेक बेझलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील २०७ शाळांमध्ये आहार बनविण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा अद्यापही करण्यात आला नाही. परिणामी अहेरी शहरासह अनेक ठिकाणच्या शाळांमधील विद्यार्थी घरून आणलेल्या डब्ब्यावर दुपारचे भोजन आटोपत असल्याचे विदारक वास्तव उजेडात आले आहे. शासनाची ही योजना गेल्या सात-आठ दिवसांपासून तालुक्यात ठप्प आहे.
अहेरी पंचायत समितीमधील एकूण २०७ शाळांना शालेय पोषण आहार योजना लागू आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १९३ शाळांचा समावेश आहे. उर्वरित शाळा खासगी व्यवस्थापनाच्या आहेत. विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्या टिकावी, गळती थांबावी तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने शासनाने शालेय पोषण आहार योजना कार्यान्वित केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून अहेरी तालुक्यातील शाळांना तांदूळ व इतर कडधान्याचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरून डब्बा आणून दुपारचे भोजन करावे लागत आहे. अहेरी तालुक्यातील अर्ध्याअधिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना बंद असल्याची माहिती आहे. सदर योजनेअंतर्गत शासनाने सुुरुवातीलाच सर्व शाळांना इंधन व इतर बाबींसाठी खर्च करावा व यापोटी येणारे बिल सादर करावे, असे सांगण्यात आले. शाळांचे मुख्याध्यापक व योजनेच्या प्रमुखांनी काही दिवस स्वत: पुढाकार घेऊन या योजनेसाठी खर्च केला. मात्र शासनाद्वारे पुरविण्यात येणारे तांदूळ पुरवठा करणे बंद झाले. शाळास्तरावर तांदूळ व इतर साहित्याची खरेदी करून त्याचे बिल सादर करावे, अशा शासनाच्या सूचना होत्या. मात्र याबाबीला अनेक शाळांचे मुख्याध्यापक असमर्थता दाखवित असल्याने विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनावर संक्रात येण्याची शक्यता आहे.
शासनाने इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रती विद्यार्थी १०० ग्रॅम तांदूळ व इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम तांदूळ देण्याचे या योजनेत नमूद केले. सदर योजना लागू असलेल्या अहेरी तालुक्यातील एकूण २०७ शाळांमध्ये ५ हजार ५८ मुले व ४ हजार ७७८ मुली असे एकूण ९ हजार ८३६ विद्यार्थी सदर शालेय पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. यामध्ये ६ हजार ४१४ विद्यार्थी प्राथमिक श्रेणीत येतात.
या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्रॅमनुसार ६४१ किलो ग्रॅम तांदूळ व माध्यमिक शाळांमधील ३ हजार ४२२ विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम प्रमाणे ५१३ किलो ग्रॅम तांदूळ दररोज लागते. एकंदरीत १ हजार १५४ किलो ग्रॅम तांदूळ अहेरी तालुक्यातील या सर्व शाळांना आवश्यक आहे. मात्र पुरवठ्याअभावी आहार बंद आहे.
जास्त पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थी वंचित
अहेरी तालुक्यातील ज्या लहान शाळांमध्ये १ ते ३० पर्यंत पटसंख्या आहे, अशा शाळांमधील मुख्याध्यापक उधारीवर तांदूळ व कडधान्य खरेदी करून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ देत आहेत. मात्र १०० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना एका दिवशी भरपूर प्रमाणात तांदूळ लागत असल्याने अशा शाळांमधील मुख्याध्यापकांनी साहित्याची जुळवाजुळव करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे तालुक्यातील मोठ्या शाळांमधील विद्यार्थी मध्यान्ह भोजन योजनेपासून वंचित आहेत. परिणामी अनेक शाळांचे विद्यार्थी काही दिवसांपासून घरून भोजनाचे डब्बे नेत आहेत.

आम्ही संपूर्ण शाळांसाठी पोषण आहाराकरिता लागणारे तांदूळ व कडधान्याच्या मागणीची यादी जि.प. स्तरावर पाठविली. मात्र तांदूळ पुरवठ्याची कंत्राट प्रक्रिया न झाल्यामुळे तांदूळ व इतर साहित्याचा पुरवठा झालेला नाही. अशा परिस्थितीत तालुक्यातील ही योजना लागू असलेल्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरील या साहित्याची खरेदी करून विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्याध्यापकांनी बिल सादर करावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
- निर्मला वैद्य, प्रभारी गटशिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, अहेरी

Web Title: Students' lunch is at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.