११ वीसाठी शोधावे लागतील विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:15 AM2018-06-16T00:15:38+5:302018-06-16T00:15:38+5:30
यावर्षी दहावीचे एकूण ११ हजार २५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता सुमारे १४ हजार ४० एवढी आहे. प्रवेश क्षमतेच्या २ हजार ७८९ विद्यार्थी कमी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षी दहावीचे एकूण ११ हजार २५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता सुमारे १४ हजार ४० एवढी आहे. प्रवेश क्षमतेच्या २ हजार ७८९ विद्यार्थी कमी आहेत. यातील काही विद्यार्थी दुसऱ्या फिल्डमध्ये जाणार आहेत. त्यामुळे पूर्ण प्रवेश न होता तीन हजार पेक्षा अधिक अकरावीच्या जागा रिक्त राहणार आहेत. प्रवेशासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागणार आहे.
काही वर्षांपूर्वी दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थी सरळ अकरावीला प्रवेश घेत होता. मात्र सध्या परिस्थिती बदलली आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी आयटीआय, पॉलिटेक्निकला प्रवेश घेतात. तर काही विद्यार्थी जिल्ह्याबाहेर शिक्षणासाठी जातात. यामुळे जरी जिल्ह्यातून ११ हजार २५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या घटणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कला शाखेच्या एकूण १७० तुकड्या आहेत. विज्ञान शाखेच्या ६० तुकड्या व वाणिज्य शाखेच्या चार तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये ६० विद्यार्थ्यांना सर्वप्रथम प्रवेश दिला जातो. एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयात ६० पेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशास इच्छुक असल्यास शिक्षणाधिकारी २० पर्यंत विद्यार्थी वाढवून देतात. त्यापेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचे असल्यास शिक्षण उपसंचालक नागपूर यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीने आणखी २० विद्यार्थी वाढवून दिले जातात. वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या अकराव्या वर्गाच्या तुकडीची विद्यार्थी क्षमता ८० एवढी राहते. त्यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने पुन्हा २० विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत. शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक वाढीव प्रवेश देतात. मात्र संबंधित महाविद्यालयात तेवढे विद्यार्थी बसण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. याची पडताळणी केल्यानंतरच वाढीव प्रवेश दिला जातो. प्रत्येक तुकडीत किमान ६० विद्यार्थी पकडले तर कला शाखेची प्रवेश क्षमता १० हजार २००, विज्ञान शाखेची प्रवेश क्षमता ३ हजार ६०० व वाणिज्य शाखेची प्रवेश क्षमता २४० एवढी आहे. यावर्षी प्रवेश क्षमतेच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वाढीव प्रवेश देण्याची गरजच राहिली नाही. तर ज्या महाविद्यालयांना किमान विद्यार्थी सुद्धा मिळत नाही, अशा महाविद्यालयांसाठी विद्यार्थी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. शासनाने मागील काही वर्षात विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालयांची खैरात वाटली. त्यामुळे प्रवेश क्षमता वाढली. मात्र लोकसंख्या स्थिर असल्याने त्या तुलनेत विद्यार्थी वाढू शकले नाही. परिणामी कनिष्ठ महाविद्यालयीन तुकड्यांसाठी विद्यार्थी कमी पडत असल्याने विद्यार्थ्यांची शोधाशोध करावी लागत आहे.
कला महाविद्यालयांची अडचण वाढली
गडचिरोली जिल्ह्यात कला महाविद्यालयाच्या एकूण १७० तुकड्या आहेत. या तुकड्यांची प्रवेश क्षमता १० हजार २०० एवढी आहे. पूर्वी सर्वाधिक विद्यार्थी कला शाखेत प्रवेश घेत होते. मात्र मागील काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. आता विद्यार्थी विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक राहतात. शहरातील बहुतांश विद्यार्थी विज्ञान शाखेसाठीच अर्ज करतात. परिणामी विज्ञान महाविद्यालयांना प्रवेश क्षमतेच्या अधिक विद्यार्थी उपलब्ध होतात. त्यामुळे गुणवत्ता यादी लावून प्रवेश द्यावा लागतो. तर दुसरीकडे कला महाविद्यालयातील शिक्षकांना ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.