विद्यार्थ्यांचा शौचविधी उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:44 PM2017-09-15T22:44:40+5:302017-09-15T22:45:24+5:30

सर्पदंशाने आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही आदिवासी आश्रमशाळा-वसतिगृहांमधील परिस्थितीत बदल होताना दिसत नाही.

Students open the dormitory | विद्यार्थ्यांचा शौचविधी उघड्यावर

विद्यार्थ्यांचा शौचविधी उघड्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देसर्पदंशाच्या घटनेची पुनरावृत्ती शक्य : कोठीच्या आश्रमशाळेतील वास्तव, पलंगाअभावी खाली झोपतात विद्यार्थी

रमेश मारगोनवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : सर्पदंशाने आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही आदिवासी आश्रमशाळा-वसतिगृहांमधील परिस्थितीत बदल होताना दिसत नाही. भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाºया कोठी येथील पहिली ते दहावीच्या १०६ मुलांना शौचालयाच्या दुरवस्थेमुळे रात्री-बेरात्री जीव मुठीत घेऊन चक्क उघड्यावर शौचविधीसाठी जावे लागत आहे. यामुळे सर्पदंशाच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेची ही दिरंगाई म्हणजे ‘कळते पण वळत नाही’ अशी स्थिती आहे.
कोठी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिकणारे २२३ विद्यार्थी आहेत. त्यापैकी १६७ विद्यार्थी वसतिगृहात राहतात. त्यात १०६ मुले आणि ६१ मुली आहेत. परंतू एवढ्या विद्यार्थ्यांच्या निवासाच्या व्यवस्थेचे मात्र तीनतेरा वाजले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांच्या शौचालयाची अत्यंत वाईट अवस्था आहे. सेप्टिक टँक फुटलेला आहे. शौचालय चोकअप झालेले आहेत. पण त्याच्या दुरूस्तीकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. परिणामी सर्व मुलांना शौचविधीसाठी बाहेर जावे लागते. शाळेत स्वच्छ भारत अभियानाचे धडे गिरवताना प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना बाहेर शौचास जावे लागते. रात्रीच्या अंधारात बाहेर शौचास जाताना साप-विंचवाची भिती असते. पण शाळा प्रशासनाला त्याचे काहीही वाटत नाही.
गेल्यावर्षी याच आश्रमशाळेच्या दुरवस्थेवर लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर मुलींच्या शौचालय, स्रानगृहाची चांगली सोय करण्यात आली. पण मुलांच्या नशिबी अजूनही नरकयातना आहेत. शाळेचे वॉल कंपाऊंड तुटून पडल्याने मोकाट गुरांचा शाळेच्या आवारात मुक्तसंचार असतो. सात-आठ वर्षापूर्वी एका वर्गखोलीचे आणि कर्मचाºयांच्या वसाहतीचे बांधकाम करण्यात आले. पण तेही निकृष्ट दर्जाचे होते. तरीही तत्कालीन प्रकल्प अधिकाºयांनी ते ताब्यात घेतले. त्यावरून कामाच्या दर्जाविषयी अधिकारी किंवा कंत्राटदार यांना काहीही घेणे देणे नसल्याचे स्पष्ट होते. वरिष्ठ अधिकाºयांनी कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी सावध होणे गरजेचे आहे.
जमिनीवर झोपतात १०६ मुले
या आश्रमशाळेच्या नवीन इमारतीमध्ये यावर्षीपासून वर्ग भरत आहेत. परंतू निवास व्यवस्थेत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. तळमजल्यावर असलेल्या एका बहुउद्देशिय सभागृहात १०६ मुले दाटीवाटीने झोपतात. विशेष म्हणजे त्यांना झोपण्यासाठी पलंगही नाहीत. त्यामुळे फरशीवर गादी किंवा चादर टाकून झोपावे लागते. अशात रात्रीच्या वेळी विषारी सापाने त्या सभागृहात प्रवेश केल्यास विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. पण त्याचे कोणालाही काही सोयरसुतक दिसत नाही. पालकवर्गाने वारंवार पलंग उपलब्ध करण्याची मागणी केली, मात्र काही फरक पडला नाही.
दुरवस्थेला जबादार कोण?
कोठीच्या शासकीय आश्रमशाळेतील या दुरवस्थेबद्दल भामरागडचे प्रकल्प अधिकारी मोरे यांना विचारणा केली असता त्यांनी वेळ मारून नेण्याचे उत्तर दिले. जुन्या वर्गखोल्यांची डागडुजी करून तिथे मुलांची निवास व्यवस्था करणार असल्याचे ते म्हणाले. पलंगांची व्यवस्था, शौचालयांची दुरूस्ती, कर्मचाºयांची रिक्त पदे आणि इतर समस्यांसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला आहे, पण प्रशासनाकडून मंजुरी आल्यावरच या गोष्टी होतील असे ते म्हणाले. यामुळे दुरवस्थेसाठी नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महिला अधीक्षकाचे पद रिक्त
६१ मुली वसतिगृहात राहात असताना या ठिकाणी महिला अधीक्षकाचे पद रिक्त आहे. एका महिला सहायक शिक्षिकेकडे तात्पुरता अतिरिक्त प्रभार दिला आहे. पण त्या मुलींसाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. यावरून मुलींच्या सुरक्षिततेबाबत आदिवासी प्रकल्प विभाग किती गंभीर आहे हे दिसून येते.
थंड पाण्याने आंघोळ, जनरेटरअभावी अंधाराचे साम्राज्य
या वसतिगृहातील सोलर वॉटर हिटर लावले तेव्हापासूनच बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ते नवीन लावले होते की कुठले बंद पडलेले लावले होते हेच कळायला मार्ग नाही. अशात विद्यार्थ्यांना थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागत आहे. येणाºया हिवाळ्याच्या दिवसातही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
येथील जनरेटर अनेक दिवसांपासून बाहेरच धूळखात आणि गंजत पडून आहे. कितीही वेळ वीज पुरवठा खंडित झाला तरी जनरेटर सुरू होत नाही. कागदोपत्री मात्र जनरेटर सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नळावर लावलेले मोटरपंप बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हातपंपावर जाऊन कपडे धुवावे लागतात.

Web Title: Students open the dormitory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.