शिक्षणशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:32 AM2021-01-21T04:32:54+5:302021-01-21T04:32:54+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून शिक्षणशास्त्र हा विषय ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून शिक्षणशास्त्र हा विषय केवळ कला शाखेसाठी ऐच्छिक विषय म्हणून ग्रुप सी मध्ये समाविष्ट केला होता. परंतु हा बदल शिक्षणशास्त्र विषय शिकवणाऱ्या महाविद्यालयापर्यंत न पोहोचल्यामुळे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी सत्र २०१९-२० मध्ये शिक्षणशास्त्र विषय घेऊन दोन वर्ष अभ्यास केला. परंतु बारावी बोर्डाचे फॉर्म भरतेवेळी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षणशास्त्र विषय निवडता येत नव्हता. त्यामुळे पालक, विद्यार्थी व शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने ही समस्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. शिक्षणमंत्र्यांनी यासंबंधी कार्यवाही करून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना एप्रिल, मे २०२१ च्या परीक्षेत शिक्षणशास्त्र विषय घेऊन प्रविष्ट होण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने शासन व प्रशासकीय स्तरावर निवेदन पाठवून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये व कोणताही शिक्षक या बदलामुळे अतिरिक्त ठरू नये, यासाठी तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली हाेती. अन्यथा राज्यभर आंदाेलन करण्याचा इशारा डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेतर्फे शासनाला देण्यात आला हाेता. या आंदाेलनाची दखल घेऊन शासनाने परीक्षेला बसू देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती परिषदेचे पदाधिकारी प्रा.शेषराव येलेकर यांनी दिली आहे.