ऑनलाइन परीक्षेसाठी नेटवर्कच्या शोधात विद्यार्थी पोहोचले छत्तीसगड सीमेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:49+5:302021-03-09T04:39:49+5:30
सोमवारी बीएस्सी व बीएच्या तिसऱ्या सेमिस्टरचे पेपर होते. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची मोठी ...
सोमवारी बीएस्सी व बीएच्या तिसऱ्या सेमिस्टरचे पेपर होते. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची मोठी धांदल झाली. काही विद्यार्थ्यांना तर परीक्षेपासूनच वंचित राहावे लागले. इंटरनेटसाठी कुठे नेटवर्क मिळेल याचा शोध घेत विद्यार्थी भटकत होते. काहींनी २५ ते ३० कि.मी. अंतरावरील गोंदिया जिल्ह्यातील चिचगड, तर काहींनी छत्तीसगड सीमेवरील गावाजवळ जाऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथेही चांगले नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांची फजिती झाली.
कोरची तालुक्यात मागील दोन दिवसांपासून नेटवर्क नसल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाला दिली होती. मात्र, तरीही पेपर झाले असल्याचे वनश्री महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले. कोरची तालुका निर्मितीपासून तालुक्यात फक्त भारतीय दूरसंचार निगमचे नेटवर्क आहे, ते कधी बंद तर कधी चालू राहते. येथील दूरसंचार विभागात एकही जबाबदार अधिकारी नाही. एका चौकीदाराच्या भरवशावर गेल्या कित्येक वर्षांपासून सेवा दिली जात आहे.
कोरोनामुळे बाहेरगावी/शहरात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या गावी आले आहेत. त्यांच्यासुद्धा ऑनलाइन परीक्षा व अभ्यासक्रम शिकविला जात आहे; परंतु कोरची येथील नेटवर्कच्या व्यत्ययामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी नेटवर्कची समस्या गंभीर झाली आहे. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा केली जात आहे.