गतिरोधकाअभावी विद्यार्थ्यांना धोका
By admin | Published: November 17, 2014 10:54 PM2014-11-17T22:54:45+5:302014-11-17T22:54:45+5:30
आरमोरी-देसाईगंज या मुख्य मार्गाच्या बाजूलाच आदर्श इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालय असून या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी शाळादर्शक फलक नाही.
देसाईगंज : आरमोरी-देसाईगंज या मुख्य मार्गाच्या बाजूलाच आदर्श इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालय असून या महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या ठिकाणी शाळादर्शक फलक नाही. त्याचबरोबर गतिरोधकही नसल्याने वाहने सुसाट वेगात जात असून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
देसाईगंज हे जिल्ह्यातील एकमेव औद्योगिक शहर आहे. या ठिकाणची बाजारपेठ प्रसिद्ध असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक देसाईगंज येथे विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी येतात. त्याचबरोबर देसाईगंज येथून अनेक ठिकाणी मार्ग जातात. रेल्वेचे प्रवासीही देसाईगंज येथूनच पुढे मार्गक्रमण करतात. या सर्वबाबींमुळे देसाईगंज शहरात दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू राहते. देसाईगंज-आरमोरी या मुख्य मार्गाच्या अगदी बाजुलाच आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात सुमारे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या मार्गावर सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शाळकरी मुलेही ये-जा करतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या ठिकाणावरून वाहनांची गती कमी करण्यासाठी गतीरोधक तसेच शाळादर्शक फलक लावणे आवश्यक आहे. याबाबत नगर परिषद व बांधकाम विभागाकडे शाळा प्रशासनाने अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र अजूनपर्यंत गतीरोधक निर्माण करण्यात आला नाही. त्याचबरोबर फलकही लावण्यात आलेला नाही.
महाविद्यालय लक्षात घेऊन दुभाजकामध्ये अंतर ठेवणे आवश्यक होते. मात्र अंतर नसल्याने विद्यार्थ्यांना जवळपास २०० मिटरचा फेरा मारून महाविद्यालयांमध्ये यावे लागते. महाविद्यालयाच्या परिसरातच उच्चभ्रू नागरिकांची वस्ती आहे. त्यांचीही वाहने नेहमीच ये-जा करतात. या ठिकाणी नेहमीच लहान-मोठे अपघात होत असतात. भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाविद्यालयाच्या इमारतीसमोर गतीरोधक निर्माण करावा व शाळादर्शक फलक लावावा, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)