विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचे पेपर सोडवले जंगलात बसून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:34 AM2021-03-10T05:34:53+5:302021-03-10T05:35:10+5:30
गोंडवाना विद्यापीठातील सावळागोंधळ; नेटवर्कसाठी गडचिरोलीचे विद्यार्थी थेट छत्तीसगड सीमेवर
लिकेश अंबादे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची (जि. गडचिरोली) : आधीच इंटरनेटचे कमजोर सिग्नल व त्यातही अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची मोबाइलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची चांगलीच फजिती झाली. काहींनी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेत जाऊन तर काहींनी नेटवर्कच्या शोधात थेट छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव घेत पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांना तर नेटवर्क उपलब्ध न झाल्याने पेपर सोडवण्यापासून वंचित राहावे लागले.
गोंडवाना विद्यापीठाच्या बीएस्सी आणि बीए या पदवी अभ्यासक्रमाची सध्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. पण कोरचीत दोन दिवसांपासून मोबाइल नेटवर्कच नव्हते. परिणामी, सोमवारी पेपर सोडविण्यासाठी नेटवर्क मिळवताना विद्यार्थ्यांना रानावनात भटकंती करावी लागली. नेटवर्कचा शोध घेत विद्यार्थी भटकताना दिसले. काहींनी २५ ते ३० किमी अंतरावरील गोंदिया जिल्ह्यातील चिचगड, तर काहींनी छत्तीसगड सीमेवरील गावाजवळ जाऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न केला.
कोरची तालुका निर्मितीपासून या तालुक्यात फक्त बीएसएनएलचे नेटवर्क आहे. बहुतेकदा ते सापडतच नाही. येथील दूरसंचार विभागात एकही जबाबदार अधिकारी नाही. एका चौकीदाराच्या भरवशावर गेल्या अनेक वर्षांपासून सेवा दिली जात आहे.
कोरची तालुक्यातील नेटवर्कची जोडणी भंडारा जिल्ह्यातून आहे. तिकडे रस्त्याच्या कामामुळे बिघाड निर्माण होऊन दोन दिवस नेटवर्क प्रॉब्लेम निर्माण झाला होता, तो आता दुरुस्त झाला आहे, असे बीएसएनएलचे सहायक महाव्यवस्थापक जे. एफ. खुराणा यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही
nऑनलाइन पेपर सोडवताना तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्यांमार्फत विद्यापीठाला त्वरित कळवावे. त्यांचा पेपर पुन्हा घेण्याची व्यवस्था केली जाईल, असे विद्यापीठाचे
परिपत्रकच आहे.
nतांत्रिक कारणामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे गोंडवाना विद्यापीठाच्या
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी सांगितले.