आयटीआयला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:27+5:302021-07-27T04:38:27+5:30
गडचिराेली : औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेतील ट्रेड अर्थात अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आठवडाभराच्या कालावधीत जिल्हाभरातील ...
गडचिराेली : औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेतील ट्रेड अर्थात अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आठवडाभराच्या कालावधीत जिल्हाभरातील दहावी उत्तीर्ण जवळपास ४३० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहे. आयटीआयला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असली तरी अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळण्यास विलंब झाल्याने आयटीआयला फार्म भरण्यासाठी उशीर हाेत आहे.
गडचिराेली जिल्हा मुख्यालयासह इतर ११ तालुके मिळून १२ ठिकाणी शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्था आहेत. याशिवाय आदिवासी विकास विभागाच्या जांभिया, खमनचेरू, रामगड व काेरची आदी चार ठिकाणच्या शासकीय आश्रमशाळेत औद्याेगिक प्रशिक्षण संस्था आहेत. एकूण १६ आयटीआय संस्था मिळून विविध ट्रेडच्या एकूण २ हजार ५२० जागा आहेत. या जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
एकूण जागा - २,५२०
आलेले अर्ज - ४३०
शासकीय संस्था - १२
आश्रमशाळा संस्था - ४
शासकीय संस्था जागा - २,२७२
आश्रमशाळा संस्था जागा - २४८
बाॅक्स ...
गतवर्षी ३० टक्केवर जागा रिक्त
काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावरील औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला नाही. परिणामी अहेरी उपविभागात तसेच काेरची तालुक्यात बऱ्याच जागा शिल्लक राहिल्या. गडचिराेली येथील आयटीआयसह जिल्हाभरातील ३० टक्के जागा गतवर्षी रिक्त राहिल्या हाेत्या.
बाॅक्स .
विविध प्रकारचे २४ ट्रेड उपलब्ध
गडचिराेली येथील औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत १ वर्षीय अभियांत्रिकी, व्यवसाय अभ्यासक्रम, एक वर्ष बिगर अभियांत्रिकी व्यवसाय अभ्यासक्रम तसेच दाेन वर्षीय अभियांत्रिकी व्यवसाय अभ्यासक्रम मिळून एकूण २४ ट्रेड आहेत. या ट्रेडच्या एकूण ३१ तुकड्या असून ६७२ जागा उपलब्ध आहे. सद्य:स्थितीत डिझेल मेकॅनिकल, इलेट्राॅनिक्स व फिटर या ट्रेडला विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स ...
विद्यार्थी म्हणतात...
इयत्ता दहावी उत्तीर्ण झालाे असून ६० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. राेजगाराच्या दृष्टीने आयटीआय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण ऑनलाइन अर्ज केला आहे. - प्रकाश ताेबर्लावार.
मला इयत्ता दहावीत ६७ टक्के गुण मिळाले असून इयत्ता अकरावीसाठी सीईटीचा फार्म भरण्याच्या तयारीत आहे. त्यापूर्वीच आपण आयटीआयसाटी ऑनलाइन अर्ज केला आहे. - अंकित सावरबांधे