विद्यार्थ्यांनो! यश-अपयशाचा विचार न करता प्रयत्न करा
By admin | Published: September 17, 2015 01:38 AM2015-09-17T01:38:27+5:302015-09-17T01:38:27+5:30
विद्यार्थ्यांनी यश, अपयशाचा विचार न करता सतत प्रयत्न करावे व यश संपादन करावे, शिक्षणात मोठे व्हायचे असल्यास अपमानाच्या पलीकडे...
कुलगुरूंचे आवाहन : शासकीय विज्ञान महाविद्यालयात मुक्त संवाद
गडचिरोली : विद्यार्थ्यांनी यश, अपयशाचा विचार न करता सतत प्रयत्न करावे व यश संपादन करावे, शिक्षणात मोठे व्हायचे असल्यास अपमानाच्या पलीकडे गेल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीचे अवलोकन करता येत नाही, असे मत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी मांडले.
गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी-प्राध्यापक यांच्याशी मुक्त सुसंवाद साधताना बुधवारी सकाळी ते बोलत होते. डॉ. नामदेव कल्याणकर यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम शासकीय विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा घेतला.
याप्रसंगी ते म्हणाले की, कुलगुरू पदासाठी आजवर पाचवेळा मुलाखती दिल्या. शेवटी गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू म्हणून आपली नियुक्ती झाली. अपयशाने खचून जाता कामा नये व यशाने हुरहुरून जाऊ नये, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारून आठवडा लोटला. अतिशय तळमळीने आपण काम सुरू केले आहे, असे सांगून ते म्हणाले की, विद्यापीठ निर्मितीमागे शासनाचा पहिला उद्देश सामाजिक समता निर्माण करणे हा आहे. त्यातून पुढे विद्यापीठात पुढील वर्षी किमान तीन पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम सुरू करू व मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सहकार्याने हे अभ्यासक्रम चालविले जातील. विद्यापीठात संशोधनावर जास्त भर देण्याची गरज आहे व यादृष्टीने आपण काम करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जैव तंत्रज्ञान, रसायन प्रद्योगिकी व माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात आपण गोंडवाना विद्यापीठाला पुढे नेऊ, असेही ते म्हणाले. त्यासोबतच संशोधनाकरिता शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला. त्यांच्याकडून प्रश्न जाणून घेऊन त्याला उत्तर दिली.
या कार्यक्रमाला शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयराम खोब्रागडे, प्रा. वाघमारे, प्रा. साळुंखे, प्रा. भावसार, प्रा. अष्टपुत्रे, प्रा. कासर्ला, प्रा. सेरिया, प्रा. पुसाला, प्रा. नासरे, प्रा. तायवाडे, प्रा. कोला, प्रा. बोदलकार, प्रा. शेख, प्रा. दुर्गा, प्रा. बंदे, प्रा. भैसारे आदींसह स्थानिक व्यवस्थापन समितीचे माणिक भुडे, सुमती मुनघाटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्राची गणवीर तर आभार अधिर इंगोले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. अष्टपुत्रे, जयश्री नंदेश्वर, अर्चना शिवणकर, यामिनी सोनुले, शिल्पा सहारे, पल्लवी तोरे, रोहिणी कांबळे, संपदा पायाळ, चेतना वासेकर, प्राची दुधबळे यांनी सहकार्य केले.