विद्यार्थी रात्रीपर्यंत अडकले सिरोंचात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 11:23 PM2022-09-27T23:23:38+5:302022-09-27T23:24:13+5:30
सिरोंचा-अहेरी हा रस्ता खराब आहे, परंतु झिंगानूर-आसरअल्ली-अंकिसा आणि टेकडाताला या मार्गावर जाण्यासाठी सिरोंचा मुख्यालयी दोन, तीन बसेस ठेवल्यास विद्यार्थ्यांना सोयीचे होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. सध्या सिरोंचा बस स्थानकाची शोभा तेलंगणाच्या बसेस वाढवत आहेत. महाराष्ट्राचे एसटी महामंडळ योग्य सेवा देऊ शकत नसेल तर तेलंगणाच्या बसेसची सेवा घ्या. त्यांना परवानगी द्या, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी सिरोंचा तालुका मुख्यालयी येणाऱ्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाच्या खटारा बसेस आणि मोजक्या फेऱ्यांमुळे चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी सायंकाळी ५ वाजतापासून बस स्थानकात बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्रीपर्यंत बस स्थानकात अडकून राहावे लागले.
संध्याकाळी पाच वाजतानंतर गडचिरोलीवरून येणारी बस अंकिसा आणि आसरअल्लीपर्यंत जाते. तसेच दुसरी एक बस झिंगानूरला जाते. बहुतांश शाळकरी विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर बस स्थानकात या बसेसची वाट पाहत असतात. मंगळवारी या बसेसमध्ये बिघाड झाला. एका गाडीचे लाईट खराब होते, तर दुसऱ्या बसची बॅटरी नादुरुस्त असल्यामुळे सर्व विद्यार्थी बस स्थानकावरच अडकून होतेे.
सिरोंचा-अहेरी हा रस्ता खराब आहे, परंतु झिंगानूर-आसरअल्ली-अंकिसा आणि टेकडाताला या मार्गावर जाण्यासाठी सिरोंचा मुख्यालयी दोन, तीन बसेस ठेवल्यास विद्यार्थ्यांना सोयीचे होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
सध्या सिरोंचा बस स्थानकाची शोभा तेलंगणाच्या बसेस वाढवत आहेत. महाराष्ट्राचे एसटी महामंडळ योग्य सेवा देऊ शकत नसेल तर तेलंगणाच्या बसेसची सेवा घ्या. त्यांना परवानगी द्या, अशी मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे. महामंडळाने याची दखल घेऊन सेवेत सुधारणा करण्याची गरज आहे.
शिक्षण अधांतरी सोडून देण्याची वेळी
ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता यावे, यासाठी जिल्ह्यात मानव विकास मिशनअंतर्गत स्कूल बस सेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु सिरोंचा तालुक्यात या सेवेचा बोजवारा वाजला आहे. सदर बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडून देण्याची पाळी आली आहे.
दररोज अशा खटारा बसेसमुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींना घरी पोहोचण्यासाठी रात्रीचे १० वाजत आहे. यामुळे पालक वर्ग दररोज चिंतेत पडत आहे. काही पालक तर विद्यार्थ्यांना शाळा सोडून द्या, असे बजावत आहेत.