विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध व थंडगार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:06 PM2017-11-17T23:06:01+5:302017-11-17T23:06:21+5:30
राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून भारतीय संविधान २७५/१ योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाला कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून भारतीय संविधान २७५/१ योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाला कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कार्यवाही सुरू करण्यात आली असून प्रकल्पाअंतर्गत असलेल्या २४ आश्रमशाळांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये हे काम अंतिम टप्प्यात असून २०१८ या नवीन वर्षापासून सर्वच २४ शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.
गडचिरोली प्रकल्पाआंतर्गत कारवाफा, सोडे, रांगी, पेंढरी, गोडलवाही, मुरूमगाव, येरमागड, कोरची, मसेली, रामगड, सोनसरी, अंगारा, घाटी, भाकरोंडी, कुरंडी माल, रेगडी, पोटेगाव, मार्र्कंडादेव, भाडभिडी, कोटगूल, गॅरापत्ती व गडचिरोली येथील इंग्रजी माध्यमाची शासकीय आश्रमशाळा अशा मिळून एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. आदिवासी विकास विभागाच्या योजनेनुसार सर्वच २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्राची योजना मंजूर करण्यात आली आहे. प्रती आश्रमशाळा ५० हजार रूपयातून हे यंत्र बसविले जात आहे.
गडचिरोली प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे मिळून जवळपास १० हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये बोअरवेल, हातपंप, विहीर आदी पाणीपुरवठ्याच्या सुविधा आहेत. विद्यार्थ्यांना गढूळ व दूषित पाण्यापासून जलजन्य आजार होऊ नये, यासाठी गडचिरोली प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याच्या योजनेचे नियोजन करण्यात आले. यासाठी प्रकल्प अधिकारी डॉ. विपीन ईटनकर व सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर डॉ. ईटनकर यांनी राज्य शासनाकडून आश्रमशाळा व वसतिगृहाच्या या सुविधांसाठी जवळपास अडीच कोटींचा निधी प्राप्त करून घेतला आहे.
आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी शासकीय यंत्रणेला हे काम सोपविण्यात आले आहे. डिसेंबर अखेर हे काम पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षापासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.
२१ वसतिगृहात
योजना कार्यान्वित
गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत नाविण्यपूर्ण (टीएसपी) योजनेअंतर्गत सर्वच २१ शासकीय वसतिगृहांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक वसतिगृहाला जवळपास ५० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळत आहे. या योजनेमुळे विद्यार्थी समाधानी आहेत.