भाषेत विद्यार्थी माघारले

By admin | Published: September 24, 2016 02:58 AM2016-09-24T02:58:55+5:302016-09-24T02:58:55+5:30

शिक्षण विभागाच्यावतीने दुसरी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची पहिली पायाभूत चाचणी ९ व १० आॅगस्ट रोजी घेण्यात आली होती.

Students withdrew in the language | भाषेत विद्यार्थी माघारले

भाषेत विद्यार्थी माघारले

Next

पायाभूत चाचणीचा निकाल : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वास्तव
गडचिरोली : शिक्षण विभागाच्यावतीने दुसरी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची पहिली पायाभूत चाचणी ९ व १० आॅगस्ट रोजी घेण्यात आली होती. या चाचणीचा जिल्हाभरातील विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच संकलित झाला असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांचे विद्यार्थी गणिताच्या तुलनेत भाषा विषयामध्ये माघारले असल्याचे दिसून आले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत दुसरी ते आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांची दरवर्षी तीन पायाभूत चाचण्या घेणे बंधनकारक करण्यात आले. या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र शिक्षण परिषदेच्या मार्फत उपलब्ध करून दिल्या जातात. सदर चाचणीमध्ये भाषा व गणित या दोन विषयांचा समावेश करण्यात येतो. विशेष म्हणजे, सदर चाचणी प्रत्येक माध्यमाच्या, प्रत्येक संस्थेच्या शाळेला बंधनकारक करण्यात आली आहे.
या चाचणीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणानुक्रमे त्यांना श्रेणी दिली जाते. ८१ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी, ६१ ते ८० गुण प्राप्त करणाऱ्यांना ‘ब’ श्रेणी, ४१ ते ६० गुण प्राप्त करणाऱ्यांना ‘क’ श्रेणी व ४० पेक्षा कमी गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘ड’ श्रेणी दिली जाते. ‘अ’ श्रेणीमध्ये असलेले विद्यार्थी प्रगत मानले जातात. ‘ब’ श्रेणी प्राप्त झालेले विद्यार्थी सर्वसाधारण तर ‘क’ व ‘ड’ श्रेणी प्राप्त झालेले विद्यार्थी अप्रगत मानले जातात.
जिल्हा परिषदेच्या एकूण जिल्हाभरात १ हजार ५५३ शाळाा आहेत. या शाळांमध्ये ६५ हजार २८६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात आली असता, भाषा विषयामध्ये केवळ ३१ शाळांमधील विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत, ६२६ शाळांमधील विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत, ८२३ शाळांमधील विद्यार्थी ‘क’ श्रेणीत तर ६७ शाळांमधील विद्यार्थी ‘ड’ श्रेणीत असल्याचे दिसून येते. गणित विषयामध्ये १४७ शाळांना ‘अ’ श्रेणी, ८२८ शाळांना ‘ब’ श्रेणी, ५८३ शाळांना ‘क’ श्रेणी तर ३४ शाळा ‘ड’ श्रेणीत असल्याचे दिसून येते. भाषा विषयापेक्षा गणित हा विषय कठीण मानला जात होता. त्यामुळे आजपर्यंत विद्यार्थी गणितामध्येच मागे पडत होते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच गणिताच्या तुलनेत भाषा विषयात विद्यार्थी मागे असल्याचे दिसून येते. भाषा विषयात ‘अ’ श्रेणीत ३१ शाळा आहेत. तर गणित विषयात १४७ शाळा ‘अ’ श्रेणीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता जिल्हाभरातील शिक्षकांना भाषा विषयाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)

ज्ञानरचनावादाने विद्यार्थी गणितात पुढे
गणित हा विषय रटाळ असल्याने विद्यार्थी या विषयाकडे दुर्लक्ष करतात. जास्त वेळ त्यांची एकाग्रता टिकून राहत नाही. त्यामुळे या विषयामध्ये बहुतांश विद्यार्थी माघारत होते. मात्र नवीन शिक्षण पध्दतीनुसार गणित हा विषय विविध शैक्षणिक साहित्य, ज्ञानरचनावाद, शारीरिक हावभाव यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी गणित हा विषय आवडीने शिकत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची गणितात प्रगती झाली आहे. भाषा विषयातही विद्यार्थ्यांची प्रगती सर्वसाधारण समाधानकारक असली तरी ऱ्हस्व, दीर्घ, उकार, वेलांटी, अगदी बरोबर असेल तरच तो शब्द बरोबर मानावा, असे निर्देश शिक्षण परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तपासल्या आहेत. पदवीधर झालेल्या मराठी वाङ्मयाच्या विद्यार्थ्याला बहुतांश शब्दातील ऱ्हस्व, दीर्घ कळत नाही तर दुसऱ्या ते आठव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना ते कसे कळणार. त्यामुळेच विद्यार्थी भाषेत माघारले आहेत.

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग
‘क’ व ‘ड’ श्रेणी जे विद्यार्थी आले आहेत. ते विद्यार्थी अप्रगत आहेत, असे मानले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना किमान ‘ब’ श्रेणीत आणण्यासाठी शिक्षकांना विशेष परिश्रम घ्यावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणेची विशेष नजर राहणार आहे. त्यामुळे सदर विद्यार्थी प्रगत करण्यासाठी शिक्षक सुध्दा विशेष प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Students withdrew in the language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.