तामिळनाडूच्या आयएएस अधिकाऱ्याची भेंडाळा ग्रामपंचायतीला अभ्यास भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:25 AM2021-07-20T04:25:14+5:302021-07-20T04:25:14+5:30
भेंडाळा : तामिळनाडू राज्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आय. ए. एस. अधिकारी मुर्गनाथन यांनी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा हे ...
भेंडाळा : तामिळनाडू राज्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले आय. ए. एस. अधिकारी मुर्गनाथन यांनी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा हे गाव आपल्या अभ्यास दौऱ्यासाठी निवडले. सलग चार दिवस त्यांनी या गावाला भेट देऊन गावांत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
त्यांच्या या दौऱ्याबाबत ‘लोकमत’शी बोलताना मुर्गनाथन यांनी सांगितले की, ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९९१मध्ये तामिळनाडू राज्यातून एक आयएएस अधिकारी भेंडाळा ग्रामपंचायतीत अभ्यास दौऱ्यासाठी आले होते. त्यांनीच आपल्याला गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळा हे गाव अभ्यास दौऱ्यासाठी निवडायला सांगितले. ३० वर्षानंतर आता या गावाची काय प्रगती झाली आहे, त्याचे मूल्यांकन या अभ्यास दौऱ्यातून करीत असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा या ठिकाणावरून माहिती संकलित केली.
हे अधिकारी तामिळनाडू राज्याचे असल्यामुळे त्यांना हिंदी आणि मराठी भाषा फारशी येत नव्हती. तरीसुध्दा ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करीत होते. विशेष म्हणजे त्यांनी मराठी भाषेमध्येच आपले मनोगत प्रगट केले. त्यांच्या या अभ्यास दौऱ्यामध्ये भेंडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच कुंदा जुवारे तसेच अंगणवाडीतील कर्मचारी, तलाठी कार्यालयातील कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी या सगळ्यांनी मदत केली.
(बॉक्स)
या मुद्द्यांची जाणून घेतली माहिती
या अभ्यास दौऱ्यात सदर अधिकाऱ्यांनी गावातील समस्या काय आहेत. ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या विकासासाठी कोणत्या योजना राबविल्या जातात. अंगणवाडीमध्ये बालकांना पोषण आहार कसा मिळतो. गावांतील कोरोना स्थितीचा आढावा, कोरोना लसीकरण, शाळेतील ऑनलाईन शिक्षण, पाणीपुरवठा, सांडपाण्याचे नियोजन, रस्ते, आरोग्य व्यवस्था, गावांतील उपक्रम, धार्मिक उत्सव, आठवडी बाजार, पिकांचे संकलन करण्याची पध्दत, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना, गावांतील नागरिकांचा मुख्य आणि पर्यायी व्यवसाय अशी बरीच माहिती संकलित केली.
190721\img_20210719_122924.jpg
भेंडाळा येथील आंगणवाडी मधे माहिती जाणून घेतांना तामिळनाडू येथून आलेले आय.ए.एस.अधिकारी मुर्गनाथन सोबत सरपंचा कुंदा जूवारे , आंगणवाडी कर्मचारी आणि पंचायत समितीचे कर्मचारी