उपनिरीक्षक, पोलीस नक्षली हल्ल्यात शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 07:27 AM2020-05-18T07:27:24+5:302020-05-18T07:28:04+5:30

शीघ्र कृती पथक (क्यूआरटी) आणि विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी सकाळी ६ वाजेपासून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत होते.

Sub-inspector, martyred in police naxal attack | उपनिरीक्षक, पोलीस नक्षली हल्ल्यात शहीद

उपनिरीक्षक, पोलीस नक्षली हल्ल्यात शहीद

googlenewsNext

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने (३०) आणि जवान किशोर आत्राम (ब.नं.५२०१) हे शहीद झाले. याशिवाय एक जवान जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या कोठी पोलीस मदत केंद्र परिसरात पोयरकोटी-कोपर्शी जंगल परिसरात घडली.
शीघ्र कृती पथक (क्यूआरटी) आणि विशेष अभियान पथकाचे जवान रविवारी सकाळी ६ वाजेपासून संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. ६.३०च्या सुमारास दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पण नक्षलवाद्यांच्या गोळीने क्युआरटी पथकाचे उपनिरीक्षक होनमाने आणि जवान आत्राम यांचा वेध घेतला. तसेच दसरू कुरचामी हा जवान जखमी झाला. या चकमकीत ४ ते ५ नक्षलवादीही ठार झाले असण्याची शक्यता पोलीस विभागाने वर्तविली आहे. चकमकीनंतर अतिरिक्त कुमक पाठवून त्या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले. दुपारी जखमी जवानासह दोन्ही मृतदेह पोलीस दलाकडील हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. गंभीर जखमी दसरू कुरचामी यांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आले.
सायंकाळी पोलीस दलातर्फे दोन्ही शहिदांना मानवंदना देण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या भेटीवर असलेले पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

सन्मानित होण्याआधीच वीरमरण
पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने हे सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. पंढरपूर तालुक्यातील पुळूज हे त्यांचे मूळ गाव असून ते आॅगस्ट २०१७ पासून गडचिरोली येथे कार्यरत होते. उपनिरीक्षक म्हणून त्यांची येथील पहिलीच नियुक्ती होती. महाराष्टÑ दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले होते. पण तो सन्मान स्वीकारण्याआधीच त्यांना शहीद व्हावे लागले.

Web Title: Sub-inspector, martyred in police naxal attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.