विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:51 PM2018-09-20T23:51:37+5:302018-09-20T23:53:38+5:30
आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा करावी, अशी मागणी बिरसा सेना संघटनेचे रोशन मसराम यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आश्रमशाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीची रक्कम जमा करावी, अशी मागणी बिरसा सेना संघटनेचे रोशन मसराम यांनी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धान्य खरेदीची चौकशी करावी, आदिवासी वसतिगृहाची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद झाली आहे. ती पुन्हा सुरू करावी, जिल्ह्यातील जनतेला जळाऊ बिट स्वस्त किंमतीत उपलब्ध करून द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवाव्या, उज्ज्वला योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांना अजूनही गॅसचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे सदर लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत. पात्र लाभार्थ्यांना गॅस देण्यात यावा.
गडचिरोली जिल्ह्यात विजेची समस्या गंभीर आहे. काही गावांपर्यंत अजूनही वीज पोहोचली नाही. तसेच वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. एकदा वीज खंडित झाल्यानंतर चार ते पाच दिवस वीज येत नाही. त्यामुळे केरोसीनचा पुरवठा करण्यात यावा, विशेष बाब म्हणून ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांना अधिक प्रमाणात केरोसीन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी बिरसा सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोशन मसराम यांच्यासह दत्तू जेट्टीवार, विनायक कुमरे, रवी नैताम, सुधीर सुरपाम, वामन मेश्राम, अनिल गेडाम, प्रशांत आत्राम, अनिल भांडेकर आदी उपस्थित होते.