डीबीटीद्वारे थेट निराधारांच्या खात्यात जमा होणार अनुदान

By दिगांबर जवादे | Published: May 20, 2024 02:23 PM2024-05-20T14:23:44+5:302024-05-20T14:24:07+5:30

Gadchiroli : जिल्ह्यात १ लाख ४५ हजार लाभार्थ्यांना होणार लाभ

Subsidy to be deposited directly into the account of the destitute through DBT | डीबीटीद्वारे थेट निराधारांच्या खात्यात जमा होणार अनुदान

Subsidy to be deposited directly into the account of the destitute through DBT

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठरावीक अनुदान अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. आता मात्र थेट डीबीटीमार्फत निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे मागविली जात आहेत.


संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थीची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थीच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेमुळे अनुदान वितरणास विलंब होत होता. वयोवृद्ध लाभार्थीना अनुदानासाठी बँकांत खेटे घालावे लागत होते. मात्र, आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र करण्यात आली आहे. याबाबत निराधारांकडून आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून सुरू गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळविले जात आहे.


आता बँकेतील हेलपाटे टळणार
निराधार, वृद्ध नागरिकांना मासिक दीड हजार रुपये अनुदान शासनामार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. जिल्ह्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या सुमारे १ लाख ४५ हजार आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा होणार आहे.


ही द्यावी लागणार कागदपत्रे
निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठरावीक अनुदान दिले जाते. ते आता डीबीटीमार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाइल नंबर द्यावा लागणार आहे. आधार ज्या बँकेला लिंक असेल त्याच बँकेत पैसे जाणार आहेत.


निराधार लाभार्थ्यांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांचे बँक खाते ज्या बँकेत आहे. त्या बँकेत निधी व लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयामार्फत पाठविली जाते. बँक कर्मचारी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करतात. यात पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागत होता. आता मात्र थेट अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. त्याची प्रक्रिया करण्यासाठी आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स तसेच मोबाईल क्रमांक तलाठ्याकडे नेऊन द्यावा.
- सत्यनारायण अनमदवार, नायब तहसीलदार, कुरखेडा.
 

Web Title: Subsidy to be deposited directly into the account of the destitute through DBT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.