‘त्या’ बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:33+5:30
मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तीन पिंजरे लावण्यात आले होते. पेपरमिल कॉलनीलगत लावलेल्या पिंजऱ्यात रात्रीच्या सुमारास बिबट अडकला. सकाळी ही बाब लक्षात येताच चामोर्शीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी बिबट्याची आरोग्य तपासणी केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (गडचिरोली) : आलापल्ली वन विभागांतर्गत मार्कंडा (कं) परिक्षेत्रातील इल्लूर तसेच पेपर मिल परिसरातील वसाहतीत गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. हा बिबट पेपर मिल परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला असून, सध्या तो वन विभागाच्या ताब्यात आहे.
मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या या बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांनी दिले होते. त्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार पेपर मिल परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी तीन पिंजरे लावण्यात आले होते. पेपरमिल कॉलनीलगत लावलेल्या पिंजऱ्यात रात्रीच्या सुमारास बिबट अडकला. सकाळी ही बाब लक्षात येताच चामोर्शीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांनी बिबट्याची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्याला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
सदर बिबट्याला निसर्ग अधिवासात मुक्त करावे, की गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे हलविण्यात यावे, यासंदर्भात सोमवारला मार्कंडा वन विभागाच्या कार्यालयात एस.ओ.पी.समितीची सभा घेण्यात आली.
या सभेत जेरबंद बिबट्यास निसर्ग अधिवासात मुक्त करणे धोकादायक असल्याने गोरेगाव रेस्क्यू सेंटर नागपूर येथे पाठविण्याची शिफारस करण्यात आली, अशी माहिती मार्कंडाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांनी दिली.
दोघांचा घेतला जीव, पशुधनाचीही हानी
मागील काही दिवसांपासून या बिबट्याने पेपरमिल व इल्लूर येथे दहशत निर्माण केली होती. बिबट्याच्या हल्ल्यात एक आठ वर्षाचा मुलगा व एका इसमाला जीव गमवावा लागला होता. याशिवाय बिबट्याच्या हल्ल्यात काही पशुधनाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.