मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 01:34 PM2023-06-03T13:34:15+5:302023-06-03T13:36:51+5:30
'आदर्श' कामगिरी : नियमित विद्यार्थ्यांसोबत घेतले शिक्षण, जिद्दीला परिश्रमाची जोड
देसाईगंज (गडचिरोली) : चिकाटी, मेहनतीची तयारी व सातत्य ठेवल्यास कुठलेही यश संपादन करणे अवघड नाही. येथील आदर्श इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी अश्विनी हरिदास मुळे हिनेही अशाच पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केले आहे. मूकबधिर असलेली अश्विनी दहावीत प्रथम श्रेणीत आली असून तिच्या बोलक्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अश्विनी मुळे ही जन्मत:च मूकबधिर आहे. वयाची सहा वर्षे पूर्ण केल्यावरही तिच्या तोंडून शब्द निघत नव्हते. आई- वडिलांनी उपचार करण्याचेही प्रयत्न केले, परंतु अपयश आले. शेवटी हेटी येथील मूकबधिर शाळेत तिचा प्रवेश घेतला. त्यानंतर तिला गडचिरोली येथे मूकबधिर शाळेत शिकविले. तिथे तिचे मन लागत नव्हते त्यामुळे आई-वडिलांनी तिचा देसाईगंजच्या आदर्श इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. ती मूकबधिर असूनही सर्वसाधारण विद्यार्थांबरोबर शिकायला लागली. नेटाने अभ्यास करून तिने दहावीत ६० टक्के गुण घेतले.
कौतुकाने भारावून गेली अश्विनी
मुख्याध्यापक प्रा.दामोधर शिंगाडे,पुरुषोत्तम भागडकर,राजू मस्के,कमलेश भोवते,विनोद चौधरी यांनी तिचे घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून कौतुक केले. शिक्षकांनी केलेल्या कौतुकाने भारावलेल्या अश्विनीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
शब्दांवाचून कळले सारे...
दरम्यान., अश्विनी मूकबधिर असतानाही सहकारी विद्यार्थ्यांनी तिचा कधी अपमानास्पद वागणूक दिली नाही. अश्विनीनेही आपल्या मूकबधिर असण्याचे भांडवल न करता सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मिळून मिसळून शिकली. शिक्षकांनीही तिला योग्य ते मार्गदर्शन केले. न समजणाऱ्या बाबी ती हातवारे करून विचारत असे. शब्दांवाचून कळले सारे...याप्रमाणे तिने अध्ययन केले.