गारांसह वीज पडून १२ जनावरे ठार
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:11+5:302016-03-16T08:36:11+5:30
गारांसह वीज पडून १२ जनावरे ठार
धानोरा/पेरमिली/घोट : गारांसह वीज पडून १२ जनावरे ठारपेरमिली व चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा येथे १२ जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
घोट परिसरातील चेक चापलवाडा (मछली) येथील सुरेश तुळशिराम बारसागडे यांच्या मालकीच्या बैलावर वीज पडल्याने मृत्यू झाल्याची घटना १४ मार्च रोजी घडली. चापलवाडा परिसरात १४ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस झाला. बैल चरून घराकडे येत असताना बैलांवर वीज कोसळली. यामध्ये एक बैल जागीच ठार झाला तर दुसरा बैल जखमी झाला. तलाठी आलाम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सुरेश बारसागडे यांचे जवळपास ३० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
धानोरा तालुक्यात १४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता गारांसह वादळी पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडून गेले. येथील रिनोहर उंदीरवाडे यांच्या मालकीची एक शेळी गारपीठीच्या माराने दगावली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पंचनामा केला. उंदीरवाडे यांचे ५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच १३ मार्चच्या पावसात पहाटे रामदास नंदेश्वर रा. धानोरा यांचा एक बैल दगावला. त्यांचे २० हजारांचे नुकसान झाले आहे. मंडल अधिकारी तारेश फुलझेले यांनी मृत जनावरांचा पंचनामा केला. सदर शेतकऱ्यांनी शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे सोमवारी सायंकाळी वीज पडून ९ जनावरे ठार झाले. यामध्ये मान्तू शंकर इष्टाम यांचे तीन बैल, यशवंत मलय्या मडावी यांच्या तीन गायी, शांताराम गणपत सिडाम, श्यामराव डुंबा मडावी, शंकर मंगा गावडे यांचा प्रत्येकी एक बैल असे नऊ जनावरे ठार झाले आहेत. शेतीच्या कामासाठी सदर बैल हे सर्व शेतकरी जुंपत होते. पावसामुळे वीज कोसळल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानभरपाई द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. या अकाली पावसामुळे पिकांचे तसेच भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. अनेक जनावरेही गारांमुळे जखमी झाले आहेत.