चव्हेलातील सिंचन कागदोपत्रीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:27 PM2018-01-14T22:27:57+5:302018-01-14T22:28:10+5:30
निर्मल ग्राम पुरस्कृत चव्हेला येथील माती बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या बंधाऱ्यात एकही पाणी जमा झाले नाही. त्यामुळे शेत जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : निर्मल ग्राम पुरस्कृत चव्हेला येथील माती बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या बंधाऱ्यात एकही पाणी जमा झाले नाही. त्यामुळे शेत जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली नाही. अधिकारी व कंत्राटारांनी संगनमत करून बंधाºयाच्या बांधकामातील बराच पैसा जिरविला असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
धानोरा येथून आठ किमी अंतरावर असलेल्या चव्हेला येथील शेतशिवारात माती बंधारा २०१७ मध्ये मंजूर करण्यात आला. यासाठी ३० लाख रूपये मंजूर झाले. एका बाजूस मातीची पाळ व दुसऱ्या बाजूस डोंगराळ भाग आहे. बंधाऱ्यात पावसाचे पाणी जमा झाल्यानंतर माळंदा, चव्हेला, पवनी या गावातील हजारो एकर जमीन ओलीत होईल, असे नियोजन होते. मात्र पाळीला अनेक ठिकाणी छिद्र पडल्याने पाणी वाहून गेले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम केले असते तर साडेचार हजार एकर शेतजमिनीला सिंचन झाले असते. वेस्ट वेअरचे बांधकाम ५० फुट दूर अंतरावर होणे आवश्यक होते. मात्र जवळच बांधकाम करण्यात आले.
सध्या अस्तित्त्वात असलेली पाळ चव्हेला वासीयांनी श्रमदानातून १० फुट उंच बांधली आहे. त्याठिकाणी थातुरमातूर काम करून सुमारे ३० लाख १४ हजार रूपये उचलण्यात आले आहेत. यामध्ये कंत्राटदार व अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा स्पष्ट आरोप नागरिकांनी केला आहे.
बंधाºयाच्या पाळीला सिमेंट काँक्रिटची पिचिंग केले असते तर पाणी साचून राहिले असते. याचा लाभ ३०० शेतकऱ्यांना झाला असता. जंगली प्राण्यांनासुद्धा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली असती. गावातील पाण्याची पातळी वाढली असती. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे ३० लाख रूपये खर्च होऊनही सिंचनाची सुविधा मिळू शकली नाही, असा आरोप चव्हेलाचे उपसरपंच आनंदराव उसेंडी, माजी उपसरपंच हनमंतू नरोटे, ग्रामसभाध्यक्ष अमित नरोटे, निरंगू गावडे, बाजीराव आत्राम, ऋषी नरोटे यांनी केला आहे.
बंधाºयाच्या भ्रष्टाचाराबाबत अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. याचा अर्थ या बंधाऱ्याच्या भ्रष्टाचारात कंत्राटदारासह स्थानिक कर्मचारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात गुंतले असल्याचा स्पष्ट आरोप गावकऱ्यांनी केला असून याची चौकशीची मागणी केली आहे.
आमदारांचे आश्वासन हवेतच विरले
आ. डॉ. देवराव होळी यांनी या बंधाऱ्याला भेट दिली होती. बंधाºयाचे बांधकाम बघून झाल्यानंतर या बंधाऱ्याला पर्यटन स्थळाच्या दृष्टीने विकसित केले जाईल, असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. मात्र त्यांचे आश्वासन हवेतच विरले, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या गावाने अनेक पुरस्कार पटकाविले. पुरस्काराच्या निधीतून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमदार, खासदारांनी या गावाच्या विकासासाठी एकही निधी दिला नाही, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. स्थानिक लोकप्रतिनिधींचे या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री यांना यापुढे गावात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा गावकºयांनी दिला आहे.