कोसा उत्पादकांना सुगीचे दिवस
By admin | Published: November 6, 2016 01:28 AM2016-11-06T01:28:34+5:302016-11-06T01:28:34+5:30
सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कोसा उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
योग्य वातावरण : उत्पादनात होणार वाढ
वैरागड : सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कोसा उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोसा उत्पादकांना किमान यावर्षी तरी सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दोन हंगाम पार पडले असून या हंगामामध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत अधिक कोस्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे कोसा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया चार जिल्ह्यांमध्ये कोसाचे उत्पादन घेतले जाते. या शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना उपजीविकेचे साधन निर्माण होते. कोस्याचा प्रथम हंगाम पावसाळा संपल्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या चवथ्या आठवड्यात दुसरा हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि तिसरा हंगाम डिसेंबर, जानेवारी महिन्यात हाती येते. पहिला हंगाम चांगला आला आहे.
पुढील तीन हंगाम सुद्धा चांगले येतील, अशी प्रतिक्रिया मेंढोबोडी येथील कोसा उत्पादक शेतकरी विलास गेडाम, पत्रू गेडाम, देवराव गेडाम, बिसन गेडाम, मारोती कांबळे, रेवन मेश्राम, चरण मुंगीकोल्हे, पुंडलिक कांबळे, यशवंत गेडाम यांनी दिली. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जे हंगाम काढण्यात आले त्या हंगामात मागील पाच वर्षांच्या तुलनेत अधिक उत्पादन झाले. लाभार्थी योजनेंतर्गत बिजकोष उत्पादकांना १ हजार २०० रूपयात १०० अंडीपुंज सवलतीच्या दरात मिळतात. यात रेशीम मंडळाचा आर्थिक सहभाग आहे, अशी माहिती कोसा उत्पादक शेतकरी सुधाकर बक्षी मेश्राम यांनी दिली. येन व अर्जुन या वृक्षावर अंडीपुंज तयार केली जातात. आरमोरी येथील केंद्रातून टसर रेशीम विकासाकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
मागील पाच वर्ष विविध कारणामुळे कोस्याचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हते. काही कोसा उत्पादकांना तर तोट्याचा सामना करावा लागत होता. यावर्षी मात्र हंगाम चांगला आहे. (वार्ताहर)