गोळी झाडून एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 06:22 PM2017-09-01T18:22:24+5:302017-09-01T18:24:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी (जि. गडचिरोली) : सुटी न मिळाल्याने राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने स्वत:वर बंदूकीची गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास अहेरी पोलीस उपमुख्यालयात घडली. किरण कांबळे असे जखमी जवानाचे नाव आहे.
किरण कांबळे हा राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक १० ‘अ’ तुकडीमध्ये कार्यरत असून तो अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कर्तव्यावर होता. त्याने घरी जाण्यासाठी वरिष्ठांना सुटी मागितली होती. मात्र वरिष्ठांनी सुटी दिली नाही. परिणामी रागाच्या भरात त्याने स्वत:वर गोळी झाडल्याची माहिती आहे. गोळी झाडल्यानंतर त्याला तत्काळ अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करून प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला गडचिरोली येथे हलविण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले.
या घटनेबाबत एसआरपीएफ अधिकारी व पोलीस अधिकाºयांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. विशेष म्हणजे दीड महिन्यापूर्वी १७ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील ताडगाव पोलीस मदत केंद्रात तैनात असलेल्या बी. हनुमंतू या सीआरपीएफ जवानाने गोळी झाडून आत्महत्या केली होती.
नक्षलविरोधी अभियान राबविताना जंगलात रात्रभर मुक्काम करावा लागतो. दिवसभर कित्येक किमीची पायपीट करावी लागते. त्यातच सुट्या मिळत नसल्याने जवान तणावग्रस्त जीवन जगत असल्याचे दिसून येत आहे.