पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
By admin | Published: July 8, 2016 01:24 AM2016-07-08T01:24:56+5:302016-07-08T01:24:56+5:30
तालुक्यातील देऊळगावनजीक इंजेवारी येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी निलेश राठोड
वडिलांची पोलिसांत तक्रार : आरमोरीतील घटना
आरमोरी : तालुक्यातील देऊळगावनजीक इंजेवारी येथील पशुवैद्यकीय दवाखाण्यात कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी निलेश राठोड यांच्या पत्नीने गळफास घेऊन भाड्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
किशोरी उर्फ जानवी निलेश राठोड (२५) रा. बर्डी परिसर आरमोरी असे आत्महत्या केलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या पत्नीचे नाव आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश राठोड हे बुधवारी कामानिमित्त नागपूर येथे गेले होते. दरम्यान घरी पत्नी किशोरी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा येथील रहिवासी असलेले मुलीचे वडील मोहन चव्हान यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार दाखल केली. माझी मुलगी किशोरी हिला हुंड्यासाठी तिचे कुटुंबिय नेहमी मानसिक त्रास देत होते. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून कट रचून तिला जीवानिशी ठार करण्यात आले आहे, असे वडील चव्हान यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी मृतक किशोरीचे हिचे पती डॉ. निलेश राठोड व सासरे रामसिंग राठोड, सासू सविता राठोड, अक्षय राठोड व विष्णू आडे यांच्या विरोधात भादंविचे कलम ३०४ (ब), ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मृतक विवाहित महिला किशोरी हिचे शवविच्छेदन आरमोरीच्या रूग्णालयात करण्यात येणार होते. मात्र मृतक किशोरीचे वडील मोहन चव्हान यांनी या आत्महत्येसंदर्भात आक्षेप नोंदवून पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदविली. तसेच आरमोरी येथे किशोरी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू नका, गडचिरोलीच्या जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करा, अशी मागणी पोलिसांकडे केली. त्यामुळे किशोरी हिचे गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात गुरूवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. (शहर प्रतिनिधी)
हत्या की आत्महत्या हे गुलदस्त्यातच
गळफास घेऊन आत्महत्या केलेली किशोरी राठोड हिचे १० महिन्यापूर्वी लग्न झाले होते. तिने आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात एमएससी भाग १ अभ्यासक्रमाला प्रवेशही घेतला होता. मात्र अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. यात तिचे वडील मोहन चव्हाण यांनी तिच्या कुटुंबियाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याने किशोरीची आत्महत्या आहे की, हत्या हे गुलदस्त्यात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आरमोरीचे पोलीस उपनिरिक्षक देवरे करीत आहेत.