स्वरांना साथ देणाऱ्या सुलतानाचे आयुष्य बेसूर

By admin | Published: October 23, 2016 01:36 AM2016-10-23T01:36:50+5:302016-10-23T01:36:50+5:30

अंध असला तरी हार्मोनियम व तबला वादनात तरबेज असल्याने गायकाच्या स्वरांना साथ देण्याची कसब असलेल्या कढोली

Sultan's life co-ordinates with Vaishu | स्वरांना साथ देणाऱ्या सुलतानाचे आयुष्य बेसूर

स्वरांना साथ देणाऱ्या सुलतानाचे आयुष्य बेसूर

Next

शासकीय योजनांपासून वंचित : कढोली येथील तबला वादकाची कहानी
प्रदीप बोडणे वैरागड
अंध असला तरी हार्मोनियम व तबला वादनात तरबेज असल्याने गायकाच्या स्वरांना साथ देण्याची कसब असलेल्या कढोली येथील सुलतानाचे आयुष्य स्वत:च्या व कुटुंबातील सदस्यांच्या अपंगत्वामुळे बेसूर झाले आहे.
कुरखेडा तालुक्यातील कढोली येथे वास्तव्यास असलेल्या सुलतान अजीज खॉ पठाण याची व त्याच्या कुटुंबाची कहानी डोळ्यात पाण्यात आणणारी आहे. सुलतान हा जन्मताच दृष्टीहीन आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही मोलमजुरी करून पोटाची खडगी भरण्याबरोबरच त्याने तबला व हार्मोनियम वादनाचे धडे घेतले. हळूहळू अपंग असलेल्या सुलतानला हार्मोनियम व तबला वादनाचा छंद जडला. सुलतान हा तबला तसेच हार्मोनियम वादनात अतिशय तरबेज आहे. दृष्टीने जरी अंधळा असला तरी परमेश्वराने त्याचे कान अतिशय संवेदनशील बनविले आहेत. गाण्याचा सूर कानावर पडताच सुलतानची बोटे तबल्यावर थबकायला लागतात. त्याच्या तबला वादणाने रसिक मंत्रमुग्ध होत असले तरी त्याच्या कुटुंबाची कहानी मात्र डोळ्यात अश्रू आणणारी आहे.
सदैव अंधारवाटेने चालणाऱ्या सुलतानला पायापुरता प्रकाश देण्यासाठी कुरेशा बेगम ही सहचरणी झाली. या दोघांच्या संसार वेलीवर दोन फुले फुलली. मात्र या दोन्ही फुलांचा सुगंध कडवटच मानावा लागेल. मोठा मुलगा लतीफ हा मतिमंद आहे. तर लहान मुलगा अहमद पठाण हा बुद्धीने तेज असला तरी पायाने अपंग आहे. लतीफ हा आठव्या वर्गात शिकत आहे. तर अहमद हा नवव्या वर्गात शिकत आहे. म्हातारपणात आपली मुले काठी बनून समोर होतील, या आशेवर सुलतान जगत होता. मात्र ही आशा फोल ठरली. वयस्क सुलतानालाच संसाराचा भार उचलावा लागत आहे.
लतीफ व अहमद हे दोघेही श्री तुकाराम विद्यालयात शिकत आहेत. अहमद हा शाळेच्या दारासमोर फावल्या वेळात चणे-फुटाणे विकून प्रपंचाला मदत करीत आहे. श्री तुकाराम विद्यालयाचे मुख्याध्यापक पुस्तोडे व त्यांचे सहकारी दोन्ही भावांच्या शिक्षणासाठी प्रयत्नरत आहेत. आजपर्यंत सुलतानाला केवळ घरकूल योजनेचा लाभ मिळाला आहे. तोे मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

स्वयंसेवी संस्थांचीही पाठ
धर्माने मुसलमान असला तरी सुलतान सर्वधर्म समभाव मानतो. त्यामुळे तो व त्याचे कुटुंब तुळशीचा कधी विटाळ मानत नाही. गुलालाची त्यांना बांधा नाही. स्वत:समोर तो धर्माचे कधी बिरूद लावत नाही. गरीबांना मदत केल्याचा आव आणणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्था आहेत. मात्र अजूनपर्यंत एकाही सामाजिक व स्वयंसेवी संस्थेने या सुलतानाच्या कुटुंबाला मदत केली नाही. सुलतान हा स्वत:ची लढाई स्वत:च लढत आहे. भविष्यात आपल्याला कुणी मदत करेल, या आशेवर तो जीवन जगत आहे.

Web Title: Sultan's life co-ordinates with Vaishu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.