रविवारी जड वाहने सेमाना मार्गे केली वळती
By admin | Published: May 16, 2016 01:30 AM2016-05-16T01:30:35+5:302016-05-16T01:30:35+5:30
मूल मार्गावर भरणारा आठवडी बाजार व त्यानिमित्त मुख्य मार्गावर उसळणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलिसांनी शहरात येणारी जड वाहने
वाहतूक पोलिसांकडून अंमलबजावणी : इंदिरा गांधी चौक व कोर्टाजवळच्या चौकात उभे केले कठडे
गडचिरोली : मूल मार्गावर भरणारा आठवडी बाजार व त्यानिमित्त मुख्य मार्गावर उसळणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन शहर वाहतूक पोलिसांनी शहरात येणारी जड वाहने (एसटी वगळून) सेमाना बायपास मार्गे वळते करण्यास सुरूवात केली आहे. हा नियम केवळ रविवारपुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे.
गडचिरोली शहरात मूल मार्गावर आठवडी बाजार भरते. गडचिरोली तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील हजारो नागरिक आठवडी बाजाराला येतात. आठवडी बाजारालगत वाहन ठेवण्यासाठी कुठेच जागा नाही. त्यामुळे मुख्य मार्गाच्या बाजुला वाहने उभी केली जातात. वाहनांची ३०० मीटर अंतरावर वाहनांची रांग लागते. त्यातच रस्त्याच्या बाजूला बसलेले फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते व पादचारी यामुळे सदर मार्ग गर्दीने दिवसभर फुल्ल राहते.
याच मार्गावरून चंद्रपूर, धानोरा मार्गे जड वाहनेही ये-जा करतात. त्यामुळे बाजाराच्या दिवशी वाहतूक खोळंबत होती. ही बाब वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर बाजाराकडे येणारी जड वाहने सेमाना बायपास मार्गे वळविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दर रविवारी इंदिरा गांधी चौक व न्यायालयाजवळील चौकात तात्पुरते खांब उभे केले जात आहेत व या दोन ठिकाणी प्रत्येकी दोन वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जात आहे. चंद्रपूर मार्गे आलेले जड वाहने वाहतूक पोलीस सेमाना मार्गे वळती करतात. तसेच इंदिरा गांधी चौकातूनही जड वाहने सेमाना मार्गेच वळती केली जात आहे. वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाचे गडचिरोलीवासीयांनी स्वागत केले आहे. (नगर प्रतिनिधी)