पोलीस अधीक्षक नारगुंडात पोहोचले
By admin | Published: February 6, 2016 01:26 AM2016-02-06T01:26:30+5:302016-02-06T01:26:30+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्राला भेट देऊन....
नागरिकांशी साधला संवाद : ठाण्यासाठी १२ हेक्टर जागेला मंजुरी मिळाली
भामरागड : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्राला भेट देऊन तेथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नारगुंडा येथील पोलीस मदत केंद्राच्या इमारतीसाठी १२ हेक्टर जागेला मंजुरी मिळाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी प्राणहिता मुख्यालयाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, भामरागडचे एसडीपीओ संदीप गावित उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी दुरवस्था असलेल्या रस्ते व नाली तसेच वीज पुरवठ्याची समस्या त्यांच्यापुढे मांडली. नारगुंडा परिसरातील रस्ते, वीज, नाली आदीसह इतर समस्या मार्गी लावण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार, असे आश्वासन संदीप पाटील यांनी यावेळी दिले. याप्रसंगी त्यांनी गावकऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)