एसडीओंनी केली कामांची पाहणी
By Admin | Published: March 14, 2016 01:26 AM2016-03-14T01:26:51+5:302016-03-14T01:26:51+5:30
तालुक्यातील कासवी येथे रोहयोचे काम सुरू असून देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी शनिवारी प्रत्यक्ष कामाच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली.
कासवीत रोहयोची कामे : मजुरांशी संवाद साधून अडचणी जाणल्या
आरमोरी : तालुक्यातील कासवी येथे रोहयोचे काम सुरू असून देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी शनिवारी प्रत्यक्ष कामाच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली.
कासवी ग्रामपंचायत अंतर्गत सुकाजी पुराम ते नदीघाटापर्यंत पांदण रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यावर एकूण ३८२ मजूर काम करीत आहेत. विठोबा ढोरे ते कनेरी पांदण रस्त्याच्या कामावर ४३० मजूर तर इटियाडोह प्रकल्पाच्या कालव्याचे नूतनीकरण व मजबुतीकरण करण्याच्या कामावर ३१३ मजूर काम करीत आहेत. या तिन्ही कामांना उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मजुरांसोबत संवाद साधला. काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यादरम्यान मजुरांनी रोहयोची मजुरी मिळण्यास खूप विलंब होत असल्याची बाब उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी रोहयोची मजुरी शक्यतो लवकर देण्याचे निर्देश अभियंता पात्रे यांना दिले. विशेष म्हणजे सलग दीड किमीवर काम सुरू असून हा संपूर्ण भाग पायदळ फिरूनच कामाची पाहणी केली. कामाच्या प्रगती व दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी सज्जनपवार, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी निमजे, कासवीचे उपसरपंच प्रवीण रहाटे, रोजगारसेवक अजय गुरनुले, ग्रामपंचायत सदस्य शेषराव कुमरे आदी उपस्थित होते.
कासवी गावातील शेतकऱ्यांचे धानाचे पीक गेल्याने मोठ्या प्रमाणात रोहयो कामाची मागणी केली जात आहे. मजुरांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतसुद्धा नागरिकांना काम उपलब्ध करून देत आहे. (प्रतिनिधी)