कृषी सहसंचालकांनी केली शेततळे, बोडीच्या कामाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2016 01:24 AM2016-05-30T01:24:21+5:302016-05-30T01:24:21+5:30
नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाच्या वतीने ...
शेतकऱ्यांशी साधला संवाद : योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
एटापल्ली : नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी विभागाच्या वतीने एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली व चंदनवेली येथे करण्यात आलेल्या शेततळे व बोडी नूतनीकरणाच्या कामाची पाहणी गुरूवारी केली.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय एटापल्लीमार्फत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षात तालुक्यात जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आली. नागपूर येथील विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी शेततळे व बोडी नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. दरम्यान त्यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेततळे, बोडी नूतनीकरण, मातीनाला बांध या कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा झाली. रबी हंगामात भाजीपाला पिके व इतर दुबार पिके घेण्यास या कामांमुळे मदत झाली, असे शेतकऱ्यांनी कृषी सहसंचालक विजय घावटे यांना सांगितले.
मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग दर्शवून कृषिक्रांती घडवावी, असे आवाहन कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी यावेळी केले. याप्रसंगी जि. प. सदस्य कारू रापंजी, एटापल्लीचे तालुका कृषी अधिकारी के. ई. हडपे, मंडळ कृषी अधिकारी ए. ए. भोयर, एस. सी. चव्हाण, वासनिक, बेंडकाळे तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
शेततळे योजनेच्या सहभागाबाबत कृषी विभागाचे कौतुक
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत एटापल्ली तालुक्यातील सर्वाधिक ३३३ शेतकरी लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षात एटापल्ली तालुक्यात जलसंधारणाची अनेक कामे पूर्ण करण्यात आली. याबद्दल विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी तालुका कृषी अधिकारी तसेच सर्वक्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भेटीदरम्यान कौतुक केले.