वडसाच्या बदक पैदास केंद्राची क्षमतावृद्धी, पुरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 07:38 PM2019-02-16T19:38:47+5:302019-02-16T19:39:05+5:30

तलावांचे जिल्हे अशी ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बदक पालनाला चालना देऊन शेतक-यांना जोडधंद्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

Supply of Duck Breeding Centers to Wadsa, Supply of Farmers to the Occupational Occupation | वडसाच्या बदक पैदास केंद्राची क्षमतावृद्धी, पुरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना पुरवठा

वडसाच्या बदक पैदास केंद्राची क्षमतावृद्धी, पुरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना पुरवठा

googlenewsNext

- अतुल बुराडे/विष्णू दुनेदार 

देसाईगंज (गडचिरोली) : तलावांचे जिल्हे अशी ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये बदक पालनाला चालना देऊन शेतक-यांना जोडधंद्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. त्यासाठी वडसा (देसाईगंज) येथे असलेल्या राज्यातील एकमेव बदक पैदास प्रक्षेत्राची क्षमतावृद्धी होऊन बदकांच्या पिलांची निर्मिती व विक्रीत तीन वर्षात चांगली वाढ झाली आहे.

शेतक-यांना तांत्रिक मार्गदर्शन करून बदक पालनाच्या व्यवसायाला चालना देणे आणि शेतीला जोडधंदा म्हणून शेतक-यांना या व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन उत्पन्नात वाढ करण्यासाठी जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) नजीकच्या ८ हेक्टर जागेत १९८५ मध्ये बदक पैदास प्रक्षेत्र सुरू करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत चालविल्या जाणा-या या केंद्राने आता ३३ वर्षांनंतर कात टाकली आहे. ३३ वर्षांपूर्वी तलावांच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या जनावरांना पिन्नस रोग व चपट्या कृमींमुळे यकृतातील विविध रोगांची लागण होत होती. त्यावर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने जैविक रोग नियंत्रणअंतर्गत हे बदक पैदास प्रक्षेत्र स्थापन करण्यात आले. पुढे तो उद्देश सफल होताच सुधारित जातीची बदक पिले निर्मिती व विक्री करणे या उद्देशावर आता बदक पैदास प्रक्षेत्र चालू आहे.

या बदक पैदास केंद्रात खाकी कॅम्पबेल जातीच्या बदकांची पैदास आणि विक्री केली जाते. बदकांच्या वयानुसार त्यांचे वेगवेगळे निवास आहेत. पाच महिने झालेल्या बदकांना लेअर हाऊसमध्ये बंदिस्त ठेवले जाते. या ठिकाणी सद्यस्थितीत २५० मादी आणि ५० नर बदकं आहेत. या बदकांपासून दररोज २५० अंडी मिळत असून त्यानुसार प्रतिमहिना १००० अंडी प्रक्षेत्रात तयार होतात. ती अंडी उबवणी केंद्रातील अंडी उबवणी मशीनमध्ये ठेवली जातात. उबवणीचा कालावधी २८ दिवसांचा असून याकरिता दोन अंडी उबवणी मशीन्स आहेत. पिलू अंड्यातून बाहेर येण्यापासून तर पाच महिन्यांपर्यंत त्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाते. पाच महिन्यांनंतर लेयर हाऊसमध्ये पाठविले जाते. सद्यस्थितीत या प्रक्षेत्रात एकच लेयर हाऊस असून त्याची पक्षीक्षमता केवळ ३५० आहे. त्यामुळे अंडी उत्पादन क्षमतासुद्धा कमी आहे. दुस-या लेअर हाऊसनंतर पक्षी क्षमता दुप्पट होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी वाढतेय पिलांची संख्या
बदक पैदास प्रक्षेत्राच्या मागील सात वर्षांपासूनच्या अंडी उबवणी केंद्रातून बदक पिले निर्मितीत आणि विक्रीत वृद्धी होताना दिसते. सन २०१२-१३ मध्ये ३६७१ पिलांची निर्मिती करून विक्री करण्यात आली. २०१३-१४ मध्ये १४१९ पिले, २०१४-१५ या वर्षात प्रक्षेत्रातील कर्मचा-यांच्या रिक्त पदांमुळे पिलेनिर्मिती मंदावली. सप्टेंबर २०१५ च्या अखेरीस पशुधन विकास अधिकारी पी.जी. सुकारे रूजू झाल्यानंतर पिले निर्मिती व विक्रीत चांगली वाढ झाली. २०१६-१७ मध्ये २३२५, सन २०१७-१८ मध्ये ५८१० पिले तर २०१८-१९ मध्ये ६ हजारावर पिले निर्मितीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१८ पासून आतापर्यंत २५०० पिलांची निर्मिती करून विक्री झाली आहे. येथील बदकांची पिलं गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यातील बदक पालन करणारे व्यापारी, शेतकरी खरेदी करतात.

--------------------------------
बदक पालन हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. विविध जिल्ह्यातील शेतक-यांनी याचा लाभ घेतल्यास उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल.
- पी. जी. सुकारे, पशुधन विकास अधिकारी, बदक पैदास प्रक्षेत्र
वडसा (देसाईगंज)

Web Title: Supply of Duck Breeding Centers to Wadsa, Supply of Farmers to the Occupational Occupation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.