जिल्ह्यात साडेसहा हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:10 AM2017-11-08T00:10:01+5:302017-11-08T00:10:12+5:30
रबी हंगाम २०१७-१८ करिता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी उपसंचालक (खते) कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे सर्व प्रकारची मिळून एकूण १८ हजार ३०० मेट्रिक खताची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रबी हंगाम २०१७-१८ करिता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी उपसंचालक (खते) कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडे सर्व प्रकारची मिळून एकूण १८ हजार ३०० मेट्रिक खताची मागणी केली आहे. यापैकी आतापर्यंत साडेसहा हजार क्विंटल मेट्रिक टन खताचा पुरवठा कृषी आयुक्तालयाकडून गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे, अशी माहिती जि. प. कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, मक्का, ज्वारी, हरभरा, लाखोळी, मूग, जवस, तीळ, सूर्यफूल, करडई, भूईमूग व वाटाणा आदी प्रकारची पिके घेतली जातात. गडचिरोली जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २३ हजार ४०० इतके आहे. तर यंदा ३१ हजार ५३१ इतके क्षेत्र प्रस्तावित केले आहे. रब्बी पिकांची पेरणी काही प्रमाणात झाली असून काही भागात सुरू आहे. रब्बी पिकांना खतांचा तुटवडा जाणवू नये, यासाठी जि.प. च्या कृषी विभागाने खरीप हंगामातच नियोजन केले. त्यानुसार कृषी आयुक्तालय कार्यालयाकडे खताची मागणी केली. डीएपी ३ हजार मेट्रिक टन, एमओपी ८०० मेट्रिक टन, एसएसपी ३ हजार ५०० मेट्रिक टन इतक्या खताची मागणी केली आहे. तसेच ५ हजार ५०० खताची मागणी आगाऊ स्वरूपात केली असून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात साडेसहा हजार मेट्रिक टन इतक्या खताचा पुरवठा झाला आहे.
जिल्ह्याच्या बहुतांश कृषी केंद्रात खत उपलब्ध असून त्याची शासकीय दरात पीओएस मशीनने विक्री सुरू आहे.
खतांचा वापर वाढला
रासायनिक खतांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खरीप हंगामाबरोबर रबी हंगामातील पिकांनाही रासायनिक खते वापरली जात आहेत. त्यामुळे वर्षभर खतांचा साठा राखून ठेवावा लागतो.