चामोर्शीत नळाला गढूळ व चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:30 AM2021-07-25T04:30:33+5:302021-07-25T04:30:33+5:30
पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी येत आहे. परंतु, मार्कंडादेव रोडवर नगरपंचायत प्रशासनाचे जल शुद्धीकरण केंद्र आहे. नदीतील गढूळ पाणी जलशुद्धीकरण ...
पावसाळ्यात नदीला गढूळ पाणी येत आहे. परंतु, मार्कंडादेव रोडवर नगरपंचायत प्रशासनाचे जल शुद्धीकरण केंद्र आहे. नदीतील गढूळ पाणी जलशुद्धीकरण केंद्रात टाकून त्या ठिकाणी ते पाणी शुद्ध करून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मागील २० दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रात बिघाड झाल्याने त्यापासून पाणी शुद्ध होत नसल्याने चामोर्शी शहरवासीयांना पिण्यासाठी गडूळ व चिखलयुक्त पाणी भरावे लागत आहे. पावसाचे दिवस असल्याने गढूळ पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने यंत्राची दुरुस्ती करून चामोर्शीकरांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जलशुद्धीकरण निर्मितीला पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असून जलशुद्धीकरण केंद्रात असलेल्या विविध यंत्राची झीज होत आहे. त्यामुळे त्या यंत्रात बिघाड होऊन पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना गढूळ पाणी पिण्याची वेळ आलेली असून प्रशासनाने या जलशुद्धीकरण केंद्रातील मशिनरीकडे लक्ष घालून यंत्राची दुरुस्ती लवकरात लवकर करून चामोर्शी शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
बॉक्स -
दुरुस्ती करणार
जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध पाणी करणारे बेड चोकअप झाल्याने पाणी शुद्ध करण्यास अडथळा निर्माण होत आहे. दुरुस्ती करून येत्या चार दिवसांत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती नगरपंचायत चामोर्शीचे अभियंता निखिल कारेकर यांनी दिली.
240721\img-20210714-wa0146.jpg
जलशुद्धीकरण केंन्द्र फाटो