सुरजागड प्रकल्पाला लीजची जागा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:12 AM2018-06-30T01:12:37+5:302018-06-30T01:14:15+5:30
लॉयड्स मेटल कंपनीला प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी मंजूर लिजची जागा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत दिले. याशिवाय योग्य ते पोलीस संरक्षण मिळण्यासाठी नवीन पोलीस चौकीसाठीची प्रक्रिया लवकर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉयड्स मेटल कंपनीला प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी मंजूर लिजची जागा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत दिले. याशिवाय योग्य ते पोलीस संरक्षण मिळण्यासाठी नवीन पोलीस चौकीसाठीची प्रक्रिया लवकर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या दोन्ही बाबींसाठी वनविभाग आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लॉयड्स मेटल कंपनीच्या लोहप्रकल्पासंदर्भात निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण दूर झाले आहे.
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या लोहप्रकल्पासाठी लॉयड्स कंपनीला सुरजागड पहाडावरील वनविभागाची ३४८ हेक्टर जागेची लिज मिळाली आहे. मात्र वर्षभरापेक्षा जास्त कालावधीपासून वनविभागाचे अधिकारी त्यापैकी थोडीही जागा देण्यास टाळाटाळ करीत आहे. याशिवाय सदर पहाडावर नवीन पोलीस चौकी तसेच विद्युत खांब लावण्याचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. या सर्व बाबींमुळे प्रकल्पाच्या उभारणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यासंदर्भातील बातम्या प्रसारित झाल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. ही बाब पालकमंत्र्यांनीही गांभिर्याने घेत शुक्रवारी अधिकाºयांची बैठक घेतली. हा प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असल्यामुळे त्याला योग्य ते सहकार्य करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू.एटबॉन, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, पोलीस उपअधीक्षक (गृह) पी.व्ही. चौगावकर, खनिकर्म अधिकारी भौंड उपस्थित होते
मार्कंडादेव मंदिर जीर्णोद्धाराच्या कामास गती द्या
भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मार्कंडादेव मंदिर जिर्णोध्दार कामास गती द्यावी. सोबतच पूर्ण गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्याळयातील बैठकीत दिले.
मंदिर जिणोध्दार करण्याच्या कामाला आॅक्टोबर २०१५ मध्ये सुरूवात झाली आहे. ही जागा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे संरक्षित घोषित असल्याने जिर्णोध्दाराचे काम त्यांना देण्यात आले आहे. या कामाबाबत निश्चित योजना व कालबध्द काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
मंदिराच्या कामासोबत नदीपासून पायऱ्यांचे काम करण्यात येणार आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळवून काम सुरु करावे असे यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले.
मंदिर परिसरासह संपुर्ण गावाचा विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिंह यांनी यावेळी बांधकाम विभागास दिले. या बैठकीस ग्रामस्थ व मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गजानन भांडेकर, मार्कंडा देवच्या सरपंच उज्वला गायकवाड, मंडळाचे सचिव डी.एस. सोरते आदी उपस्थित होते.