राष्ट्रपती दौऱ्यावर, आदिवासी विद्यार्थी वाऱ्यावर...
By संजय तिपाले | Published: June 30, 2023 04:33 PM2023-06-30T16:33:53+5:302023-06-30T16:37:03+5:30
काँग्रेसचा रास्ता रोको : सूरजागड लोह प्रकल्पामुळे रस्त्याची दैना, बसेस बंदमुळे अडचण
गडचिरोली : राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी संपूर्ण प्रशासन जोमाने कामाला लागलेले असताना दुसरीकडे आदिवासी विद्यार्थी मात्र वाऱ्यावर आहेत. सूरजागड लोहखनिज वाहतुकीमुळे रस्त्याची दैना झाल्याने बसेस बंद आहेत, त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचा आरोप करुन काँग्रेसने ३० जूनला अहेरी तालुक्यातील सुभाषनगर येथे रास्ता रोको आंदोलन केले.
जिल्ह्यात ३० जूनपासून शाळा नियमितपणे सुरु झाल्या. आष्टी-आलापल्ली रस्त्यावर सूरजागड पहाडीवरील लोह खनिजाची बेसुमार वाहतूक सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गावरील एसटी बसेसच्या फेऱ्या महामंडळाने बंद केल्या आहेत. त्यामुळे बसने सवलतीत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.
एसटी बसेस भंगार... छत गळतीमुळे प्रवासी त्रस्त, छत्री उघडून नागरिकांचा प्रवास
आदिवासी मुलांच्या उत्थानासाठी गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाकरिता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ५ जुलैला गडचिरोलीत येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र, दुर्गम भागात आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी ३० जूनला सुभाषनगर (ता.अहेरी) येथे काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांसह रस्त्यात ठिय्या देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, तालुकाध्यक्ष डॉ. निसार हकीम, हरबा मोरे, रजाक पठाण, राघोबा गौरकर, मधुकर शेडमेक, नामदेव आत्राम, हनीफ शेख, गणेश उप्पलवार, रुपेश बंदेला, दिनकर हुलके, बेबी कुत्तरमारे यांच्यासह शेकडोच्या संख्येने विद्यार्थी, पालक आंदोलनात सहभागी झाले होते.
बस सुरु करण्याची मागणी
आंदोलनस्थळी अहेरीचे तहसीलदार फारुख शेख, पोलिस निरीक्षक किशोर मानभाव, आगार व्यवस्थापक जितेंद्र राजवैद्य यांनी भेट दिली. आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी निवेदन देण्यात आले. सोमवारपासून नियमित बस सुरु करण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापक जितेंद्र राजवैद्य यांनी दिले. त्यानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले.