प्लाटून कमांडर सैनू व रूपीसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:28 AM2018-03-29T10:28:27+5:302018-03-29T10:28:48+5:30
गडचिरोली पोलिसांसमोर प्लाटून कमांडर सैनू व रूपी या पती-पत्नीसह पाच नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांसमोर प्लाटून कमांडर सैनू व रूपी या पती-पत्नीसह पाच नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
सैनू ऊर्फ मिरगू झुरू वेळदा (३५) हा एप्रिल २००१ मध्ये कसनसूर एरिया प्लाटून क्रमांक ३ मध्ये भरती झाला. २००८ मध्ये कंपनी क्रमांक ४ च्या प्लाटून ‘ए’ कमांडर म्हणून त्याची पदोन्नती झाली. त्याचा एकूण ६३ पोलीस-नक्षल चकमकीमध्ये सहभाग होता. त्याचबरोबर त्याच्यावर ११ ब्लास्टिंग, १७ खून, ४ जाळपोळ, ३ अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर १२ लाख रूपयांचे बक्षीस होते.
रूपी ऊर्फ झुरी कांडे नरोटे (३६) ही डिसेंबर २००३ मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. २००८ पासून ती प्लाटून क्रमांक ४ ‘सी’ मध्ये कमांडर म्हणून कार्यरत होती. तिच्यावर ४२ पोलीस-नक्षल चकमक, ७ ब्लास्टिंग, ८ खून व २ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर ६ लाख रूपयांचे बक्षीस होते. अर्जुन नरेश बारसाय पोया (२५) हा सप्टेंबर २०११ ला टिपागड दलममध्ये सदस्यपदावर कार्यरत होता. मार्च २०१४ पासून त्याची प्रेसटीम सदस्य म्हणून नेमणूक झाली. त्याचा ५ पोलीस-नक्षल चकमक, १ खून व ५ जाळपोळीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते.
छाया ऊर्फ राजे देवू कुळयेटी (२३) ही आॅगस्ट २०११ ला भामरागड दलममध्ये भरती झाली. मार्च २०१५ पासून साऊथ डिव्हिजन सीएनएम टीममध्ये सदस्यपदावर ती कार्यरत होती. तिच्यावर ५ पोलीस-नक्षल चकमक, ३ खून व ८ जाळपोळीचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर २ लाखांचे बक्षीस होते.
विणू ऊर्फ रामनाथ ऊर्फ बिजावू सुंदर कोवाची (२२) हा जून २०११ ला टिपागड एलओएस सदस्यपदावर भरती झाला. डिसेंबर २०१६ पासून डीव्हीसी जोगन्ना याचा गार्ड म्हणून काम करीत होता. त्याचा ६ पोलीस-नक्षल चकमक, २ खून व ७ जाळपोळीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते. आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांमध्ये सैनू वेळदा व रूपी नरोटे तसेच अर्जुन पोया व छाया कुळयेटी हे पत्नी-पत्नी आहेत. २०१७-१८ या वर्षात आतापर्यंत एकूण २७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
प्रभारी पोलीस अधीक्षक राजा आर, अपर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डॉ. हरी बालाजी, महेंद्र पंडित यांच्यासमोर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.